पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोषांची यादी देण्याचाही खटाटोप त्यांनी केलेला नाही, तर कवी, नाटककार आणि विनोदी लेखक अशा विविध नात्यांनी पुढे येणाऱ्या लेखकाचे अनुभव घेणारे मन व त्याची अभिव्यक्त होण्याची पद्धती तपासून पाहून गडकऱ्यांच्या प्रतिभेची जात ठरविण्याचा त्यांचा मानस आहे. गडकऱ्यांचे गुण व दोष . संयुक्तरीत्या उत्पन्न झाले असावेत असे वा. ल. कुलकर्णी यांना वाटते. असंभाव्य कथानके, भडक प्रसंग, प्रासयुक्त भाषा आणि अतिशयोक्तीवर भर या बाबी सुट्या सुट्या नसून त्यांचे दुवे परस्परांशी निगडित असले पाहिजेत असे त्यांना वाटते. या सर्वांची एकत्र सांधेजोड जिथे आहे त्याचा शोध घेण्यास वा. ल. उद्युक्त झाले आहेत.
  वा. ल. कुलकर्णी यांचा गडकऱ्यांवरील आक्षेप गडकयांची प्रतिभा उज्ज्वल नव्हती अगर अस्सल नव्हती हा नाही, तर आपण नाहीत ते आहोत हे समजण्यात व न जमणारे जे ते आपले क्षेत्र आहे असे उगीचच समजण्यात गडकरी गुंतले हा तो आक्षेप आहे. आपले स्वत्व न ओळखता आल्यामुळे गडकरी सतत प्रयत्नरत राहूनही असफल राहिले, याची वा. लं. ना खंत आहे. गडकऱ्यांबाबत मराठीत झालेल्या विवेचनात वालंचे हे विवेचन क्लास बाय इटसेल्फ या प्रकारचे आहे. म्हणून शेकड्यांनी पाने भरण्यापेक्षा वा. लं. चा हा प्रयत्न मला अधिक मोलाचा वाटतो.
  वा. ल. कुलकर्णी यांच्या मते गडकरी जर अधिक जगले असते तर त्यांनी थोडे अधिक वाङ्मय निर्माण केले असते, पण या वाङ्मयाचे स्वरूप मात्र आज आहे त्यापेक्षा फारसे भिन्न झाले नसते. पुष्कळदा यशस्वी नाटककाराचे यश कनिष्ठ प्रतीच्या श्रोतृसमूहाच्या कलाहीन आवडी पुरविण्यावरच अवलंबून असते. गडकऱ्यांच्या प्रतिभेचे प्रकृतिवैशिष्ट्य म्हणजे जीवनातील साधर्म्य-वैधर्म्य हुडकून काढण्याचे तिला लागलेले वेड होय. मग हे साधर्म्य-वैधर्म्य दोन व्यक्तींतील असो, दोन कल्पनांतील असो अगर दोन शब्दांतील असो. जिला आपण गडकऱ्यांची कल्पकता म्हणतो तिचाही गाभा हाच आहे. त्यांच्या वाङ्मयातील शेकडो विनोदी वचने व सुभाषिते याच जातीची आहेत. त्यांच्या अनेक कवितांचे विषयसुद्धा असेच सुचलेले आहेत. मनाचे समाधान न झाले तरी चालेल, पण कानाचे समाधान झाले पाहिजे असे त्यांना वाटे. गडकऱ्यांना साम्यवैधाचे साम्यवैधर्म्याचे जसे वेड होते तसे ही साधर्म्य अगर वैधर्म्ये

८० / रंगविमर्श