पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्णन करीत बसतात. खऱ्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष जात नाही. गडकऱ्यांच्या नाटकात इतके दोष असूनही जर वर्षानुवर्षं या नाटकांची मिठी वाचकांना अगर प्रेक्षकांना बसत असेल तर मग काही गुणही तिथे असावेत. हे गुण असे असावेत की ज्यापुढे हे सारे दोष झाकले जावेत. हे गुण कोणते?

खांडेकरांनी दाखवलेले दोष
  गडकऱ्यांच्या नाटकांतील सर्वांत विस्तृत नोंद खांडेकरांची आहे. त्यांच्या मते या नाटकांतील पहिला महत्त्वाचा दोष म्हणजे ती फार लांब आहेत. जुन्या पद्धतीप्रमाणे देखील नाटक साडेपाच-सहा तासांपेक्षा लांबले न पाहिजे. गडकऱ्यांची नाटके याहीपेक्षा लांब आहेत. 'भावबंधन'चा संपूर्ण प्रयोग तर अजून झालेला नाही. खरे म्हणजे हा दोष एकट्या गडकऱ्यांचा नाही. त्या काळच्या साऱ्या नाटकांचे असेच असे. 'संशयकल्लोळ' सुद्धा असेच काटछाट करून रंगभूमीवर सादर केले जात असे. गडकऱ्यांच्या नाटकांतील दुसरा दोष असा की त्यांतील काही प्रसंग रंगभूमीवर दाखवता येणे केवळ अशक्य आहे. 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या तिसऱ्या अंकातील पाचवा प्रवेश याचे एक नमुना उदाहरण म्हणून सांगता येईल. गळफास लावून घेतलेले द्रुमनचे प्रेत लटकत आहे असे दृश्य या प्रवेशात येते. तिसरा दोष म्हणजे गडकरी काही प्रवेश खूप लांबवतात. 'भावबंधन'चा पहिला व दुसरा प्रवेश हे गरजेपेक्षा दीर्घ आहेत, तर अगदी त्याउलट 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या दुसऱ्या अंकातील तिसरा व सहावा प्रवेश आणि तिसऱ्या अंकातील ५, ६ आणि ७ क्रमांकांचे प्रवेश दोन पृष्ठांपेक्षाही लहान आहेत. गडकरी आपल्या नाटकात पात्रांची विनाकारण गर्दी करतात. 'प्रेमसंन्यास' नाटकात एकूण मिळून वीस पात्रे आहेत. गडकऱ्यांच्या नाटकात संवादांची जागा भाषणे घेऊ लागतात हा त्यांचा आणखी एक दोष, गडकऱ्यांची भाषा अनुप्रास व कल्पनाविलास यांनी नटवी, बोजड व कृत्रिम होते. या दृष्टीने 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या दुसऱ्या अंकातील पाचवा प्रवेश पाहण्याजोगा आहे. नाट्यमय प्रसंग निवडून रचना करण्यात गडकऱ्यांना अनेकदा अपयश येते. त्यामुळे त्यांचे काही प्रवेश प्रयोगदृष्ट्या मूल्यशून्य ठरतात. असे प्रवेश केवळ कथनासाठी येतात. त्यामुळे नाटक व कादंबरी यांचा घाटसंकर होतो. शिवाय गडकऱ्यांना भडक व अतिरेकी प्रसंग आवडतात. त्यामुळे वास्तवतेचा खून होतो.

७८ / रंगविमर्श