पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पालटतो आणि एवढ्या वेषांतरामुळे तिच्या नित्य सहवासात राहणाऱ्या प्रियकरालाही ती ओळखू शकत नाही, असे दाखविले आहे. लतिका या आपल्या कानडी बनलेल्या प्रियकराशी प्रभाकरासंबंधीच बोलत बसते. हे सारे कृत्रिम असेल, असे ना का, आपल्या गुरुमाऊलीची पद्धत म्हणून त्यावर गडकऱ्यांचे प्रेम होते. गडकऱ्यांच्या नाटकातील प्रमुख दोषांचा उगम अशी गुरुघरची गायकी रियाज करून आत्मसात करावयाची या अंध व्यामोहात आहे.

खाडिलकरांचा प्रभाव
  याखेरीज त्यांच्यावर पुसटसा परिणाम खाडिलकरांचाही आहे. खाडिलकरांना आपल्या नाटकात परिणामकारक दिपवणारे असे प्रसंग रंगवण्याची सवय होती. त्यांची पात्रे लांबचलांब व्याख्यानवजा भाषणे देत. भावनेची गुंतागुंत सूक्ष्मपणे रंगवण्याऐवजी ठसठशीत प्रक्षोभ चित्रित करण्यावर खाडिलकरांचा भर असे. आपल्या नाटकासाठी भव्य प्रसंगांचे ते विकल्पन करीत. त्यांची पात्रे शृंगारात मग्न झाली तरी मौजेच्या कल्पना करतात. लाजलेल्या आनंदीबाईंच्या गालावर राघोबाला आपले प्रतिबिंब दिसल्यामुळे आपले अधिकच कोवळे रूप पाहायला मिळते. गडकऱ्यांच्या मनावर हेही संस्कार उमटलेले आहेत. कोल्हटकर-खाडिलकरांचे गडकऱ्यांवरील हे सर्व संस्कार नोंदवूनही गडकऱ्यांचे मूल्यमापन या कसोटीवर करता येणे कठीण आहे. गडकऱ्यांच्या नाटकाची आलोचना करणाऱ्या विद्वानांनी या दृष्टीने फार तपशिलाने त्यांच्या दोषांची नोंद केली आहे. गडकऱ्यांच्या नाटकांतील दोष इतके उघड आहेत की ते सांगण्यासाठी फार मोठ्या मार्मिकतेची गरजसुद्धा नाही. कधीकधी गडकऱ्यांनाच ते ठळकपणे जाणवतात. 'भावबंधन'च्या पहिल्या अंकात घनश्याम एका स्वगतात म्हणतो, असे धुंडीराजासारखे पात्र जर एखाद्या नाटककाराने आपल्या नाटकात घातले तर पहिल्या प्रवेशात नाटकाची पार्श्वभूमी व सर्व पात्रांची पूर्वओळख आपोआपच होऊन जाईल.याच नाटकाच्या शेवटच्या अंकात महेश्वर म्हणतो, “अरेरे ! आमचा व्हिलन अगदीच पडला. या दोन्ही ठिकाणी आपल्या रचनेची सदोषता गडकऱ्यांना कळली, पण ती टाळणे मात्र त्यांच्याकडून झाले नाही. आमचे आजचे टीकाकार मोठ्या चवीने या दोषांचे

नाटककार गडकरी : एक आकलन / ७७