पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाटकाच्या तोडीचे हवे होते. गडकऱ्यांची नाटके पाहून पुलकित झालेल्या प्रेक्षकांवर आपली मोहिनी घालणे नंतर कुणालाच जमले नाही. गडकऱ्यांनी मात्र आपल्या आधीच्या साऱ्या नाटकांना बाजूला सारले होते. ती मोहिनी अजूनही फारशी उतरलेली दिसत नाही. चार दशके टिकलेली लोकप्रियता, नंतरच्या लेखकांवर झालेला त्यांचा परिणाम व त्यांच्या वाङ्मयाचे समीक्षकांना असणारे अखंड कुतुहल यांचा समुच्चयाने विचार करता गडकऱ्यांची गणना मराठीतील अलौकिक लेखकांत करणे भाग पडते.
  गडकरी ज्यांना आवडतात ते लोक तरी कोण आहेत? ज्यांनी कालिदास, भवभूती, विशाखदत्त यांच्या वाङ्मयाचा मनसोक्त आस्वाद घेतला, ज्यांनी पाश्चात्य वाङ्मयातील गेल्या काही शतकांतील प्रवृत्तींचा मागोवा घेतला असे; ज्यांनी आजची तरल, सूक्ष्म, विश्लेषणात्मक कथा निर्माण केली असे हे लोक आहेत. ज्यांना शरदचंद्र आवडतो त्यांनाही गडकरी आवडतो. ज्यांना वामन मल्हार हे मराठीतले सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत असे वाटते तेच हे लोक आहेत. क्षीरसागर, वाळिंबे आणि गंगाधर गाडगीळ यांचा हा उल्लेख आहे. या साऱ्यांची गणना हीन अभिरुचीच्या, दिपलेल्या, कलाहीन परिणामांच्या प्रभावापुढे नतमस्तक झालेल्या सर्वसामान्यांत करण्याची माझी हिंमत नाही; पण तरीही अजून वाद चालू आहे. अजूनही गडकरी एक यक्षप्रश्न म्हणून शिल्लक आहे. इतका दीर्घकाल सतत वादविषय राहण्याचे भाग्य युगप्रवर्तक असणाऱ्या केशवसुतांना अगर मढेकरांनाही प्राप्त झालेले नाही. या लोकविलक्षण संदर्भात व वातावरणात गडकरी तपासला पाहिजे.

कोल्हटकरांचे शिष्यत्व हे अनेक दोषांचे कारण
  मराठी रंगभूमीवर अलौकिक यश मिळविणाऱ्या नाटककारांत गडकऱ्यांची गणना करावी लागेल; पण असे हे गडकरी रंगभूमीवर जन्मतःच हतप्रभ ठरलेल्या कोल्हटकरांना गुरुस्थानी मानीत असत. गडकऱ्यांच्या नाटकातील प्रमुख दोषांचे कारणच कोल्हटकरांचे शिष्यत्व आहे. कोल्हटकरांच्या नाटकांची नावे पंचाक्षरी असत. कारण त्यांचे नाव पाच अक्षरांचे बनलेले होते. गडकऱ्यांचे नाव चार अक्षरांचे असले तरी त्यांच्या नाटकांची नावे मात्र पंचाक्षरी ठेवण्याची त्यांची धडपड आहे. कोल्हटकरांच्याआधी नाटकांची कथानके स्वतंत्र नसत.

नाटककार गडकरी : एक आकलन / ७५