पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अन्यत्र वेधले गेले होते त्यांचे लक्ष तेथून ओढून स्वतःकडे खेचावयाचे अशी परिस्थिती केशवसुतांसमोर नव्हती. जी पिढी केशवसुतांची कविता डोक्यावर घेऊन नाचली तिला केशवसुतांच्या कवितेइतके अस्सल असे दुसरे काही उपलब्धच नव्हते. गडकऱ्यांचा मार्ग त्या मानाने बिकट होता. गडकयांना केशवसुत, विनायक, दत्त, टिळक यांच्यानंतर लिहावयाचे होते. त्यांच्या शेजारीच बालकवींनी सौंदर्याची पेठ खुली करून ठेवली होती. गडकऱ्यांचा चाहता वर्ग आजच्या काही टीकाकारांच्या समजुतीप्रमाणे अडाणी असेल. पण हा तो वर्ग होता ज्याने टिळक, बालकवी, केशवसुत यांना उचलून धरलेले होते. या संदर्भात पाहिले म्हणजे गडकऱ्यांना आपला जम बसवणे किती कठीण होते याची कल्पना करता येईल. अंधारातून उदय पावणाऱ्या प्रकाशाला आपण दिवटी असलो तरी स्वतःचे अस्तित्व जाणवून देता येते; पण भुईनळे आणि चंद्रज्योती जिथे झगमगतात तिथे जाऊन जो प्रकाशाचा झोत आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतो त्याच्या ठिकाणी विद्युल्लतेचे सामर्थ्य असावे लागते.
  नाटकाच्या क्षेत्रात तर हे अधिक खरे आहे. किर्लोस्कर, देवल, खाडिलकर यांची नाटके पाहून जी मराठी अभिरुची समृद्ध झाली होती व कोल्हटकरांच्यामुळे जी नावीन्याला चटावलेली होती त्या अभिरुचीच्या कसाला उतरणे सोपे नव्हते. 'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'शारदा', 'स्वयंवर', 'मानापमान', 'भाऊबंदकी' यांनी मराठी प्रेक्षकांचे मन धुंद झालेले असताना गडकरी या सर्वांमागून पुढे आले. या प्रेक्षकाला जिंकणे विष्णुदास भाव्यांची नाटके. पाहणाऱ्या प्रेक्षकाला जिंकण्याइतके सुकर खासच नव्हते. वरील विवेचनाचा हेतू तागडथोम नाटकांच्या अगर भाव्यांच्या नाटकांच्या नंतर येणाऱ्या किर्लोस्करांपेक्षा गडकरी नंतर उदय पावले, म्हणून ते मोठे असा मुळीच नाही. त्याचप्रमाणे ज्या प्रेक्षकांवर किर्लोस्करांनी पकड बसवली तो प्रेक्षकवर्ग तुलनेने कमी अभिरुचिसंपन्न होता म्हणून गडकरी लहान असाही नाही. 'मखमलीचा पडदा' या ग्रंथात व. शां. देसाई यांनी १९२० नंतर मराठी रंगभूमीवर आलेली चांगली नाटके एकापाठोपाठ कशी पडली याची विस्तृत चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, “गडकऱ्यांची धुंद करणारी असामान्य नाटके बालगंधर्वांच्या अलौकिक अभिनय नैपुण्यामुळे अशी काही पकड घेऊन बसली की प्रेक्षकांना दुसरे काहीच आवडेना. त्यांना यानंतरचे. प्रत्येक नाटक 'एकच प्याला' ह्या

७४/ रंगविमर्श