पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगली आहे अशी भूमिका मी घेणार नाही; पण सामान्य नियम म्हणून जे काळाच्या ओघात टिकून राहते, ते चांगले असण्याचा संभव फार मोठा असतो असे मानण्यास हरकत नाही. गडकऱ्यांच्या वाङ्मयाने आपली लोकप्रियता गेल्या त्रेचाळीस वर्षांत टिकवलेली आहे. निदान इतके श्रेय त्यांना द्यावयास हरकत नाही.

समीक्षकांना पुरून उरलेला विषय
  पण हा केवळ सामान्यात लोकप्रियता टिकवून धरण्याचा प्रश्न नाही. गेली साडेचार दशके मराठीतील समीक्षकांना गडकरी हा विषय पुरून उरला आहे. समीक्षेचा इतिहास पाहताना असे दिसून येते की एखादा लेखक उदय पावतो आणि टीकेची गर्दी होऊ लागते. पहिल्या काही वर्षांत अनुकूल-प्रतिकूल टीकेची उडालेली धूळ हळूहळू खाली बसू लागते व त्या वाङ्मयप्रकाराचे अगर प्रवृत्तीचे, लेखकाचे अगर एखाद्या साहित्यकृतीचे काही एक मूल्यमापन सर्वमान्य होऊन स्थिरावू लागते. साडेचार दशके विपुल चर्चा होऊनही गडकऱ्यांच्या बाबतीत अजून हे घडलेले नाही. मराठीतील भीषण नाट्याचे सर्वश्रेष्ठ एकमेव प्रतिनिधी, प्रतिमानिर्मितीक्षम प्रतिभेचे एकमेव नाटककार इथपासून तो अगदी सामान्य दर्जाचे नाटकी कृत्रिम लेखक इथपर्यंत त्यांच्याविषयी आग्रहाने सारे काही प्रतिपादले जाते. सतत चाळीस वर्षं न संपणाऱ्या कुतूहलाचा विषय झालेल्या गडकऱ्यांचे वाङ्मय अगदीच सामान्य, हेळसांड करण्याजोगे व तकलादू असेल अशी भूमिका घेण्याचे धाडस करणे म्हणजे स्वतःच्या वाङ्मयाभिरुचीला प्रमाण निकष मानून आजवरच्या सर्वश्रेष्ठ समीक्षांचे कुतुहल किती उथळ होते असे उपमर्दकारकतेने गृहित धरण्याजोगे आहे.

प्रभावशाली परंपराय
  गडकरीवाङ्मयाचा काळही आपण समजून घेतला पाहिजे. गडकरी म्हणजे कुंटे, मोगरे, लेंभे यांच्यानंतर येणारे केशवसुत नव्हेत. केशवसुतांच्या आधी पन्नास वर्षांत मराठीला प्रभावी कवीच नव्हता. केशवसुतांसमोर अडचणी नव्हत्या अगर त्यांना विरोध झाला नाही असे नाही; पण त्या अडचणींचे स्वरूप निराळे होते. केशवसुतांच्या कवितेला रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे इतकेच कार्य करणे आवश्यक होते. ज्या रसिकांचे लक्ष गुणप्राचुर्यामुळे आधीच

नाटककार गडकरी: एक आकलन/७३