पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण५ वे




नाटककार गडकरी : एक आकलन



  २३ जानेवारी १९१९ रोजी राम गणेश गडकरी यांनी इहलोकाची यात्रा संपवली, त्यानंतरच्या काळात वाचकवर्ग, समाजपरिस्थिती, वाङ्मय यात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलेले आहे. एके काळी अत्यंत लोकप्रिय असणारे हडप आणि नाथमाधव मागे पडले. काव्याच्या क्षेत्रात अज्ञातवासी आणि काव्यविहारी यांचा बोलबोला होता. शं. प. जोशी, माधवराव जोशी, टिपणीस, औंधकर यांच्या नाटकांनी आपापला काळ गाजविलेला होता. एका विशिष्ट कालखंडात एखादा लेखक चमकून जातो. हा कालखंड मागे पडला म्हणजे त्याची आठवणही पुसट होत जाते. ज्या काळात एखादा लेखक टूम म्हणून लोकप्रिय होतो त्या काळात अशा लेखकाची लोकप्रियता समकालीन चांगल्या लेखकापेक्षा नेहमीच अधिक असते; पण एका दीर्घ कालखंडात सामान्य वाचकाचा निवाडा जेव्हा आपण पाहू लागतो त्या वेळी काळाच्या ओघात चांगले वाङ्मयच तेवढे टिकून राहिलेले आढळून येते. वा. ल. कुलकर्णी यांनी याच अर्थाने असे मत दिले आहे की कालमुखाने वाचक ज्या वेळी कौल देतात त्या वेळी हा कौल नेहमीच चांगल्या वाङ्मयाच्या बाजूने पडत आला आहे. काळाचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे; पण निरपवादपणे तो मान्य करण्यात काही अडचणी आहेत. कित्येकदा काळाच्या प्रवाहात चांगले वाङ्मयसुद्धा नामशेष होते आणि उलट अगदी साधारण वाङ्मयसुद्धा टिकून राहते. काळाच्या ओघात एखादी साहित्यकृती पाचपन्नास वर्ष टिकून राहिली, केवळ एवढ्या आधारावर ती


  • (हा लेख इ.स.१९६२ साली लिहिलेला आहे. मूळात अप्रसिद्ध असलेला हा दीर्घ लेख त्यातील उदाहरणांचा तपशील वगळून इथे संक्षिप्त रूपात दिला आहे)
    ७२ / रंगविमर्श