पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रामशास्त्र्यांवर मात करण्याच्या प्रयत्नात आनंदीबाई दिसत नाही किंवा रामशास्त्र्याने देहान्ताची शिक्षा दिल्यानंतर आपल्या बाजूचे लोक गोळा करून प्रतिकाराला सज्ज होतानाही ती दिसत नाही. स्वतः रामशास्त्रीसुद्धा देहान्त प्रायश्चित फर्मावणारे व्याख्यान देऊन जो निघून जातो तो परत आशीर्वाद देण्यासाठीच येतो. राघोबाचा पाडाव करण्यासाठी रामशास्त्र्यांनी काही केले आहे काय? याचेही उत्तर 'नाही' असेच आहे. म्हणजे या नाटकाच्या मांडणीत संघर्षाची नीट मांडणीच नाही. अशी या नाट्याची सगळी बैठक कोसळून पडणारी आहे. जी गोष्ट 'भाऊबंदकी' बाबत तीच 'कीचकवध' आणि 'स्वयंवर' वजा जाता खाडिलकरांच्या उरलेल्या सर्व गंभीर नाटकांबाबत म्हणता येईल.

विचारनाट्यातील ठसकेबाज व्याख्याने
  खाडिलकरांच्या प्रकृतीचे वैशिष्ट्य म्हणून वा. ल. विचारनाट्याचा उल्लेख सतत करीत असतात. अतिशय प्रभावी व ठसकेबाज व्याख्याने खाडिलकरांच्या नाटकात आहेत, या गोष्टीवर दुमत असण्याचे कारण नाही; पण या प्रभावी आणि ठसकेबाज व्याख्यानांनीच खाडिलकरांच्या नाटकातील सारे स्वभावरेखन डागाळून टाकलेले आहे. खाडिलकरांची व्यक्तिरेखा म्हणजे एकेका भूमिकेचा प्रतिनिधी असणारा नमुना असतो. त्यांच्या रामशास्त्र्यांना स्वतःचा प्राण धोक्यात घालण्याच्या आधी कधी भीती वाटतच नाही. त्यांच्या द्रौपदीला धर्माची चीड येते, पण धर्माची संमती न घेता एखादी गोष्ट करून जावी असा विचार तिच्या मनात उगवतसुद्धा नाही आणि पत्नीची बेअब्रू थंडपणे पाहणाऱ्या धर्मालाही पती म्हणून निभावून न्यावे लागावे याचा विषादही त्यांच्या द्रौपदीला कधी वाटत नाही. ही माणसे खाजगी बोलोत अथवा जाहीर, ती व्याख्याने दिल्यासारखीच बोलतात आणि मैदानी वक्ते ज्याप्रमाणे टाळीचे वाक्य वेळ साधून उच्चारतात त्याप्रमाणे ही पात्रेही टाळीची वाक्ये बोलतात. खाडिलकरांच्या नाटकातील पात्रांचे स्वरूप असे एकसुरी, एकपदरी आहे, पण या पात्रांना व्यक्तिमत्त्व यावे यासाठी लागणारा सघनपणा त्यांना कुठेच नीटसा हेरता येत नाही. 'स्वयंवरातील' रुक्मिणी, 'भाऊबंदकी' तील राघोबा यांसारख्या पात्रांच्या मनात थोडाफार मानसिक संघर्ष चालल्याचे दिसते हीच त्यातल्या त्यात सुखाची जागा. मानसिक कल्लोळांना, उत्कट दुःखांना, भावनांच्या हळुवारपणाला खाडिलकरांची नाट्यसृष्टी मोठ्या

६८/ रंगविमर्श