पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाट्याचा शेवट प्रभावीपणे होतो, शेवट कोसळत नाही, त्या नाटककाराची नाट्याची समज कच्ची आणि ज्यांचे नाटक शेवटाकडे येऊ लागताना कोसळत जाते त्यांची नाट्याची समज उपजत आणि तुलनेने पक्की, ही गोष्ट मान्य करणे फार कठीण आहे.

कादंबरी व नाटक यांतील फरक
  मराठी नाटककारांना कादंबरी आणि नाटक यांतील फरक कधी सापडलाच नाही. संवादाद्वारे कथानक पुढे सांगत राहणे ही गोष्ट आणि नाट्याची मांडणी या दोन बाबी स्वतंत्र आहेत हे मराठी नाटककारांना उमजलेच नाही. जिथे उत्कटतेने कोणते नाट्य निर्माणच होत नाही; तिथे काही कोसळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही; पण ज्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो त्या ठिकाणी देवल, खाडिलकरांचे नाटक शेवटाला कोसळणारे नाटक आहे ही गोष्ट समजून घ्यावी लागते.

भाऊबंदकीत संघर्ष हेरता आला नाही
  'भाऊबंदकी' सारख्या नाटकात खाडिलकरांना संघर्षच हेरता येऊ नये ही गोष्ट त्यांच्या नाट्यविषयक उपजत जाणिवेविषयी फारसे अनुकूल मत निर्माण करणारी नाही. खाडिलकरांनी एकूण १५ नाटके लिहिली. या १५ नाटकांत यशस्वी किती झाली हा प्रश्न वाजूला ठेवला तरी संघर्षबिंदू नीट हेरून नाट्याची मांडणी करणे त्यांना किती वेळा जमले आणि किती वेळा जमले नाही याचीही मोजदाद एकदा केली पाहिजे. 'भाऊबंदकी' सारख्या नाटकात एका बाजूला आनंदीबाई आणि राघोबा आणि दुसऱ्या बाजूला सखाराम बापू, नाना फडणवीस आणि रामशास्त्री असे दोन गट आहेत. या नाटकापुरते म्हणायचे तर नाना आणि बापू यांच्यात काही कर्तृत्वच नाही. राघोबाला पेशवा होण्यास अडथळा करण्याइतके यांच्यात धैर्य नाही. पापाला वाचा फुटेल त्या दिवसाची वाट पाहणारी ही सगळी मंडळी, ज्या दिवशी रामशास्त्री राघोबाला देहान्त प्रायश्चित फर्मावतो त्यानंतरसुद्धा सेना अगर सरदार जमा करून हे राघोबाविरुद्ध उठाव करीत नाहीत; तो पुण्यातून बाहेर जाण्याची ते वाट पाहात बसतात. इकडे राघोबा पुनःपुन्हा आनंदीसमोर नमताना दिसतो. मग या नाट्याची उभारणी आनंदी विरोधी रामशास्त्री अशी व्हावयाला नको होती काय? पण सर्व नाटकभर आपला प्रमुख अडथळा म्हणून

नाटककार खाडिलकर/ ६७