पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाणात पारखी आहे. माझे प्रेम मृत्यूसकट तिकडच्या चरणांचा स्वीकार करत आहे.' या भाषेतच खाडिलकरांची माणसे बोलतात. ज्या मार्गात शील नाही, ऐश्वर्य नाही, पराक्रम नाही, विजय नाही, सुख नाही, धर्म नाही त्या मार्गाने मला जावयास का लावता?' हे व्याख्यानवजा वाक्य जोरकस मानावयाचे आणि 'मरणाचा मुहूर्त साधून रायगडचा हा राजा मृत्यूच्या विळख्यात..' अशा प्रकारच्या भाषेत गडकऱ्यांची पात्रे बोलू लागली, पतिव्रतेला नाती नसतात. ती पित्याची कन्या नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते,' असे सिंधूने म्हटले की ते मात्र कृत्रिम म्हणायचे, नाटकी म्हणायचे, ही मीमांसा पटणे फार कठीण आहे. खाडिलकर आणि गडकरी दोघांच्याही नाटकांत कान दिपवणारी, मनाला गुंगी आणणारी ठसकेबाज भाषाशैली आहे. दोघांची पद्धत निराळी असेल, पण नाटकीपण, भडकपणा, आक्रस्ताळेपणा दोन्ही ठिकाणी सारखाच आहे.
  विचारनाट्याचा उगम ठरीव भूमिकेतून भाषणे करणाऱ्या पात्रांच्या व्याख्यानातून होत नसतो. चिंतनशील व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावरेखेमधून विचारनाट्याचा उगम होत असतो. चिंतनशील पात्रांनी भरलेली नाट्यसृष्टी उभी करण्यासाठी तेवढेच भरीव स्वभावरेखन करावे लागते. मनाची आंदोलने रंगवावी लागतात, जीवनाची संगती लावण्याची धडपड आणि या धडपडीतून होणाऱ्या पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वयंभू आणि स्वाभाविक विकास दाखवावा लागतो. यांतून विचारनाट्य उगम पावत असते. राम-रावणांनी परस्परांविरुद्ध उभे राहावे आणि दोघांच्याही तलवारीचा खणखणाट ऐकू यावा हा संघर्ष असला तरी ते विचारनाट्य नव्हे. त्याप्रमाणेच भीम आणि जरासंध यांनी परस्परांचा धिक्कार करणारी व्याख्याने द्यावीत हेही विचारनाट्य नव्हे. या पद्धतीने आपण पाहू लागलो म्हणजे खाडिलकरांच्या नाटकात जे आहे त्याचे स्वरूप विचारनाट्याचे नव्हे ही गोष्ट दिसून येते.

विनोदनिर्मितीसाठी खलपुरुषांचा वापर
  खाडिलकरांनी आपल्या नाटकांत खलपुरुषांनाच विनोदनिर्मितीसाठी राबविलेले आहे. खलपुरुषांचा असा वापर विनोदाचीही हानी करतो, खलपुरुष कोसळतातच. खलनायक कोसळत असल्यामुळे नाट्याचीही हानी करतो. गडकऱ्यांच्या नाटकात विनोदासाठी निष्कारणची पात्रे असतील, पण त्यांनी

नाटककार खाडिलकर/६९