पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मागे पडली नाहीत; ती त्यापूर्वीच मागे पडलेली होती. ऐन लोकप्रियतेच्या काळातही 'सौभद्र'ची लोकप्रियता कोल्हटकरांना कधीच नव्हती. आणि पुढे चालून 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', या नाटकांनाही 'सौभद्र', 'मानापमान' आणि 'स्वयंवर' यांची लोकप्रियता मिळाली नाही. याच काळात 'संशयकल्लोळ' संगीत होऊन आला होता. गडकऱ्यांच्या ज्या नाटकांनी लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण केले ती नाटके म्हणजे 'भावबंधन' व 'एकच प्याला'. ऐतिहासिक सत्य असे आहे की “एकच प्याला' रंगभूमीवर येण्यापूर्वीच कोल्हटकरांची लोकप्रियता ओसरून दीर्घकाळ झाला होता. 'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान' आणि 'स्वयंवर' ही नाटके तुफान लोकप्रिय होती, त्यांनी मराठी रसिकांना वेडे केलेले होते; पण किर्लोस्कर, देवल, खाडिलकर यांच्या नाटकांची लोकप्रियता गडकऱ्यांच्या उदयाला बाधक ठरू शकली नाही. अशा प्रकारे आपण १९२० पर्यंत येतो. यापुढच्या कालखंडात एकीकडे मनोहारी संगीत, विनोद, सुखद नाट्याभास, बालगंधर्व, गणपतराव बोडस, हलके फुलके नाटक, कुशल संवाद आणि दुसरीकडे सदोष असणारे पण बालगंधर्वांनीच उभे केलेले गडकऱ्यांचे 'एकच प्याला' हे गंभीर शोकनाट्य, असा सामना चालू होता. भडक, सदोष, अतिरेकी, विस्कळीत अशा नानाविध दोषांनी व्याप्त असणारा गडकयांचा 'एकच प्याला' गंभीर नाटक असूनही व शोकांतिका असूनही सहजपणे लोकप्रिय बनणाऱ्या कुशल नाट्याभासावर मात करून गेला हा इतिहास आहे. वा. लं. ना घटनांचे हे कालानुक्रम मान्य असल्याचे दिसत नाही.

शेवटचे प्रवेश का कोसळतात?
  'भाऊबंदकी' यासारख्या खाडिलकरांच्या अत्यंत यशस्वी नाटकाचे शेवटचे प्रवेश साफ कोसळतात ही गोष्ट सर्वांनीच नोंदवलेली आहे; पण देवलांच्या 'शारदा' नाटकाचीही हकिगत यापेक्षा निराळी नाही. त्याही नाटकाचे शेवटचे प्रवेश साफ कोसळून पडतात. कोसळत नाही 'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान', आणि 'स्वयंवर'. या जोडीला गडकऱ्यांचा 'एकच प्याला'. गडकऱ्यांच्या नाट्यलेखनात, मांडणीत दोष नाहीत असे नाही. उलट ते दोष फार उत्कट आहेत; पण नाटकाचा शेवट कोसळत जाणे ही गोष्ट गडकऱ्यांच्या नाटकात घडत नाही. ज्या नाटककाराचे पहिले अंक चटकन पकड घेतात आणि

६६ / रंगविमर्श