पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आसुरी संपत्ती हा संघर्ष रंगविण्याची संधी खाडिलकरांनी टाळली हे म्हणणे निराळे. कारण या दुसऱ्या ठिकाणी आपण कच विरोधी शुक्राचार्य, देव विरोधी दानव, दैवी संपत्ती विरुद्ध आसुरी संपत्ती हा संघर्ष नाटककाराने रंगविणे आवश्यक होते असे सांगून पुन्हा एकदा जीवनाचा संदर्भ देत असतो. वा. लं. च्या शुद्ध कलावादी भूमिकेला जीवनाच्या व्यापक आणि खोल आकलनाची पार्श्वभूमी सदैव आढळते तशी याही ठिकाणी आहे. श्रेष्ठ कलाकृतीत जीवनाचे व्यापक व खोल आकलन असलेच पाहिजे हा वा. लं.चा आग्रह मला बरोबर वाटतो. मात्र हा आग्रह त्यांच्या शुद्ध कलावादी भूमिकेत चपखल बसणारा आहे की माझ्यासारख्या जीवनवादी भूमिकेचा सांधा न तोडणाऱ्याच्या विचारात हा आग्रह चपखल बसणारा आहे याविषयी मी साशंक आहे.
 विद्याहरणावरचीच नव्हे, तर वा. लं.ची कोणतीही समीक्षा वाचताना ही गोष्ट मला सारखी जाणवत आली आहे. वास्तविक जीवनाच्या संगतीतून, आकलन व अवलोकनातून वाङ्मयाचे सामर्थ्य वाढते. वाङ्मयात असणारा जिवंतपणा हा जीवनातून व त्याच्या निकट साहचर्यामुळे वाङ्मयात अवतीर्ण होत असतो आणि श्रेष्ठ वाङ्मयकृतीच्या संपर्कात असताना कलेपेक्षा जीवनाचे भान आपणाला अधिक होते ही वा. लं.ची भूमिका मला रास्त वाटते. या भूमिकेतून त्यांनी केलेले रसग्रहण ठिकठिकाणी अतिशय मार्मिक आणि मर्मग्राही झाले आहे असे मला वाटते. जीवनवादी समीक्षा म्हणजे बोधवादी समीक्षा, उपयक्तवादी समीक्षा नव्हे हे मान्य करून खऱ्या जीवनवादी समीक्षेची आपण पाहणी करू लागलो व तंत्रवाद आणि मनोरंजन म्हणजे कलावाद नव्हे हे समजून घेऊन शुद्ध कलावादी भूमिकेकडे आपण वळलो तर या दोन्ही दृष्टिकोनात थोडीशी तफावत असली तरी प्रत्यक्ष रसग्रहणात, आस्वादात हे अंतर अगदी पुसट होऊन जाते. कलावादी आणि जीवनवादी समीक्षेतील हा फरक जवळजवळ पुसट झाल्याचा अनुभव वीस वर्षांपूर्वी केलेले वामन मल्हारांचे विवेचन आणि आज त्यांनी केलेले खाडिलकरांचे विवेचन दोन्ही ठिकाणी सारखाच जाणवतो.

ऐतिहासिक नाटकात नवनिर्मितीची शक्यता
 ऐतिहासिक नाटकांकडे वा. ल. वळले की लगेच ऐतिहासिक नाटकात

नाटककार खाडिलकर / ६३