पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्याला' पेक्षाही, विद्याहरण'च कसे प्रभावी आहे हा मुद्दाही तपशिलाने मांडतात. वा. लं.नी 'विद्याहरण' हे नाटक संपूर्णपणे अयशस्वी ठरविलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की जोपर्यंत शुक्राचार्यांच्या भूमिकेला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त होत नाही, जोपर्यंत त्याच्या संप्रदायाचा दर्जा आपणासमोर येत नाही, तोपर्यंत शुक्राचार्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेम वाटणे संभवनीय नाही आणि म्हणून त्याचे पतन शोकात्मही वाटणे शक्य नाही. एक श्रेष्ठ दर्जाचे विचारनाट्य खाडिलकरांना या नाटकात निर्माण करता आले असते, पण ती संधी त्यांनी गमावलेली आहे. या नाटकातील विनोद निर्माण करणारी सर्व प्रभावळ शुक्राचार्यांच्या जीवनाची शोकात्मिका डागाळून टाकते, त्याचे व्यक्तिमत्त्व साकार होत नाही. आणि या नाटकात देवयानीच्या दारुण प्रेमभंगाची हकीगत चटावरचे श्राद्ध उरकल्याप्रमाणे उरकली जाते. म्हणून नाटकाचा शेवट परिणाम म्हणून केवळ रसभंग करणारा नाही, तर संपूर्ण नाटकाला रसशून्य करणारा आहे. स्वभावरेखनावर आत्यंतिक भर देणारी वा. लं. ची ही विवेचनपद्धती 'विद्याहरण'च्या बाबतीत पुन्हा सर्वसामान्य समजुतीविरोधी निर्णय देऊन बसली आहे.

वा. लं.ची शुद्ध कलावादी वाङ्मयीन भूमिका
 'विद्याहरण'चे वा. लं.नी केलेले मूल्यमापन हेही मला महत्त्वाचे वाटते. मात्र ते वा. लं.च्या शुद्ध कलावादी वाङ्मयीन भूमिकेत कुठवर सामावून जाते याविषयी मला शंका आहे. ज्या वेळी आपण उत्कट प्रेम करणाऱ्या देवयानीचा दारुण प्रेमभंग दाखवण्याची जबाबदारी नाटककारावर टाकतो, त्या वेळी नाटकात देवयानी आणि कच यांचे स्थान पाहण्याऐवजी आपण त्या घटनेची वास्तविक जीवनातील गंभीरता विचारात घेत असतो. खाडिलकरांनी या नाटकात कच-देवयानीचा अनावश्यक विस्तार केला, अस्वाभाविक कलाटणी दिली हे म्हणणे निराळे, कारण हे म्हणणे त्या कलाकृतीच्या चौकटीच्या संदर्भात असते, आणि देवयानीचा दारुण प्रेमभंग दाखवायलाच हवा होता हे म्हणणे निराळे. कारण तिथे आपण जीवनाची संगती शोधीत असतो. शुक्राचार्य जोपर्यंत आदरणीय होत नाहीत तोपर्यंत त्यांचे पतन शोकात्म होणे शक्य नाही हे म्हणणे निराळे आणि शुक्राचार्यांच्या स्वभावरेखेचे निमित्त करून दैवी संपत्तीविरुद्ध

६२ / रंगविमर्श