पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पत्रिका वाचून तिच्या स्वीकाराला तयार होणारा श्रीकृष्ण वेगळा आणि कंसवधापासून सुरू झालेल्या धर्माची स्थापना चिरस्थायी करण्याकरिता मला स्वयंवराला आमंत्रणाविना येणे भाग पडले असे म्हणणारा कृष्ण अगदी निराळा आहे. खाडिलकरांच्या कृष्णाला धर्म आणि अधर्म यांच्यामधील संघर्षाचा निर्णय रणभूमीवर करून समाधान नाही. सुशीलकुमारांनी प्रीतीच्या छापाने हा निर्णय 'मुक्रर केला पाहिजे.' आदिशक्तीच्या सिंहासनापुढे पुरुषार्थाचा निर्णय लागला पाहिजे असे श्रीकृष्णाला वाटते. पौराणिक कथाभागातून खाडिलकरांनी रुक्मिणी आणि श्रीकृष्ण या दोन्ही व्यक्तिरेखा नव्याने निर्माण केलेल्या आहेत. मराठी नाट्यसृष्टीतील पौराणिक नाटकात नवनिर्मितीचा प्रश्न ज्या वेळी उपस्थित होईल त्या वेळी खाडिलकरांची रुक्मिणी आणि त्यांचा कृष्ण या दोन्ही पात्रांची महत्त्वपूर्ण दखल घ्यावी लागेल. त्या दृष्टीने या कथानकात खाडिलकरांना नवे समरप्रसंग निर्माण करावे लागले. मूळ कथानकातील रुक्मि विरुद्ध श्रीकृष्ण या संघर्षाला न सोडता त्याच्या पोटात आणि चपखलपणे त्या चौकटीत सामावून जाणारे नवनवे संघर्ष व ताण खाडिलकरांना नव्याने निर्माण करावे लागले. वा. लं. नी केलेले स्वयंवर नाटकाचे मूल्यमापन हे या कलाकृतीवर पुन्हा एक नवा प्रकाश टाकणारे विवेचन आहे.

विद्याहरण : अयशस्वी नाटक
 'स्वयंवर' आणि 'मानापमान' या दोन नाटकांवो वा. लं.नी केलेली फेरतपासणी व त्यांनी केलेली रसग्रहणे हा या पुस्तकाचा व एकूण खाडिलकर विवेचनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असे माझे मत आहे. त्याबरोबरच ज्या ठिकाणी वा. लं.नी जुनी मते मधून मधून धक्का दिल्यासारखी कोलमडून टाकली आहेत, ती ठिकाणे पाहण्याजोगी आहेत. सामान्यत्वे विद्याहरण नाटकाचा जयघोष करण्याकडे सर्वांची प्रवृत्ती आहे. काहीजण तर हे नाटक खाडिलकरांच्या नाट्यसृष्टीतील सर्वश्रेष्ठ नाटक आहे असेही मानताना आढळतात. एक टीकाकार म्हणतो, खोचदार ध्वनिपूर्ण असा विनोद खाडिलकरांच्या 'मानापमान' व 'विद्याहरण' या दोन नाटकांतून काय तो आढळतो. 'कीचकवध' या नाटकातील स्वारस्य समकालीन परिस्थितीचा विसर पडल्यानंतर कमी होणारे आहे. 'विद्याहरण'चे तसे नाही. काही जण मद्यपानविरोधी नाटक म्हणून 'एकच

नाटककार खाडिलकर/६१