पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संगीत मानापमान: नवा प्रकाश
  वा. लं. नी केलेल्या विवेचनामुळे खाडिलकरांच्या नाटकावर संपूर्णपणे नवा प्रकाश पडलेला दिसून येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'संगीत मानापमान'चे रसग्रहण हे आहे. या नाटकाने मराठी टीकाकारांना सदैव घोटाळ्यात टाकलेले होते. कोणी प्रामाणिकपणे हा घोटाळा कबूल करीत, पण बहुतेकांना हा घोटाळा जाणवत नसे. कारण या नाटकात अत्यंत भित्रा आणि मूर्ख लक्ष्मीधर श्रीमंतांचा प्रतिनिधी आहे. गरीब विरोधी श्रीमंत या झगड्यात सधन वर्गाचा धूर्तपणा, बेडरपणा आणि धाडसीपणा लक्षात घेतला जातो. लक्ष्मीधर हे पात्र श्रीमंतांचे प्रतिनिधी होऊ शकेल काय? हा छळणारा पहिला प्रश्न. या नाटकातील अत्यंत शूर, पराक्रमी व देखणा धैर्यधर तितकाच तारुण्यसुलभ शृंगारवेधी आहे. तो झटकन स्त्रियांकडे आकर्षित होतो. तो सेनापती आहे. जगातील गरिबांचा हा धैर्यधर प्रतिनिधी आहे काय? हा दुसरा प्रश्न. लक्ष्मीधरसारखा भ्याड माणूस रणांगणावर पाठवला तरी कशाला होता आणि ऐन सरहद्दीवर भामिनी राहत कशी होती हा छळणारा तिसरा प्रश्न. या नाटकात एका क्षणी धन नसेल तर इतर सर्व गुण विफल आहेत असे म्हणून धैर्यधराचा अपमान करणारी भामिनी दुसऱ्या क्षणी धैर्यधरावर भाळते आणि धनराशीचा तिटकारा करू लागते हे हृदयपरिवर्तन कितीसे स्वाभाविक आहे हा छळणारा चौथा प्रश्न. या चार प्रश्नांत सारेजण गढलेले होते. इतके अस्वाभाविक, ठिसूळ कथानक असणारे हे नाटक, मग याचा प्रयोग इतका रंगदार होतो कसा? याचे समाधानकारक उत्तर टीकाकारांना कधीच देता आले नाही. या सर्व प्रश्नांमध्ये अजून एक प्रश्न विचारून वा. लं.नी भरच घातली आहे. तो प्रश्न म्हणजे भामिनी धैर्यधराशी लग्न करते त्या वेळी धैर्यधर गरीब राहिलेला नसतोच. त्याला २५ लाखाची जहागीर व तीन चांदांची सरदारकी मिळालेली असते. शेवटी लक्षाधीश भामिनीचे लग्न लक्षाधीश धैर्यधराशीच होते. यात धन सोडून पराक्रमी व गुणवान निर्धन पुरुषाकडे आकर्षित होण्याचा प्रसंग भामिनीवर खऱ्या अर्थाने येतोच कुठे? खरे म्हणजे एका गंभीर नाटकाकडे ज्या पद्धतीने पाहावे त्या पद्धतीने 'मानापमान' कडे पाहणे हीच मूळ चूक होती. 'मानापमान' हा शक्यतेच्या सर्व सीमा गुंडाळून ठेवणारा एक सुखद नाट्याभास आहे. स्वेच्छेने बुद्धीला आणलेल्या अर्धवट

नाटककार खाडिलकर/ ५९