पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्पष्ट करणारा आहे.) वा. लं. चे हे परिशिष्ट १८६२ पासून सुरू होते. मराठी नाटकाचा उगम आपण सर्वजण विष्णुदास भावे यांच्यापासून मानतो. एका दृष्टीने असे मानणे रास्त आहे. नाटक ही घटना आणि नाटक हा प्रयोग विचारात घेतला म्हणजे विष्णुदास भाव्यांच्यापासूनच आरंभ केला पाहिजे; पण नाटक ही वाङमयीन कलाकती असा आपण विचार करू लागलो. तर मराठीतील पहिले विचारात घेण्याजोगे नाटक कीर्तने यांचे आहे. वा. लं. नी हा आरंभ अचूक हेरलेला आहे. खाडिलकरांना लहानपणी 'शाकुंतल', 'मृच्छकटिक' ही नाटके पाहण्यास मिळाली होती ही गोष्ट या परिशिष्टावरून समजते. विचार करताना आपण किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर आणि खाडिलकर याप्रमाणे विचार करतो; पण फाल्गुनरावांचा 'संशयकल्लोळ' होऊन ते नाटक लोकप्रिय होण्यापूर्वी कोल्हटकर घडून गेले आहेत. 'संशयकल्लोळ' 'फाल्गुनराव' या स्वरूपात रंगभूमीवर येण्यापूर्वीच खाडिलकरांचे पहिले नाटक लिहून झाले आहे, ही गोष्ट या परिशिष्टावरून स्पष्ट होईल. 'सवाई माधवरावांचा मृत्यू' सारखे नाटकसुद्धा 'विविध ज्ञानविस्तारातून' प्रकाशित झाल्यानंतर त्याचा प्रयोग होण्यास १०-११ वर्षे तशीच निघून जावी लागली ही माहिती खाडिलकरांच्या नाटकांनी जनतेच्या मनाची पकड प्रथमतः घेण्यास किती वेळ जावा लागला हे समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. खाडिलकरांचे 'मानापमान' आणि गडकऱ्यांचे 'प्रेमसंन्यास, खाडिलकरांचे ‘स्वयंवर,' आणि गडकऱ्यांचे 'पुण्यप्रभाव' यांचे परस्परसंबंध व लोकांसमोर येण्याचे त्यांचे काळ या परिशिष्टावरून अतिशय स्पष्टपणे समजून येतील. नाटकांच्या नोंदी करताना आपण फार ढोबळ नोंदी करतो. 'सौभद्र.' 'शाकुंतल', 'शारदा', 'संशय कल्लोळ' यांची नोंद आपण विसरत नाही, पण 'राणा-भीमदेव', 'संत तुकाराम', 'राक्षसी महत्त्वाकांक्षा', 'संन्यस्तखड्ग' व 'आग्याहून सुटका' या नाटकांच्या नोंदी आपण सहज विसरून जातो. कोणत्या नाटकाचे प्रयोग त्या त्या काळी गाजले आणि कोणती नाटके खाडिलकरांच्या विरोधी उभी होती हे कळण्यासाठी हे परिशिष्ट महत्त्वाचे आहे. यात परिश्रमपूर्वक केलेल्या परिशिष्टांचा काळजीपूर्वक अभ्यास मराठी नाट्यसृष्टीच्या आकलनाला अतिशय उपयोगी ठरेल असे माझे वैयक्तिक मत आहे.

५८/ रंगविमर्श