पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तत्कालीन वातावरण व संदर्भ
  एखाद्या लेखकाचा अभ्यास करीत असताना ज्या वातावरणात आणि ज्या संदर्भात तो लेखक उभा राहिला ते वातावरण व तो संदर्भ ध्यानात घेणे महत्त्वाचे असते. ही माहिती म्हणजे वाङ्मयीन मूल्यमापन नव्हे, ही गोष्ट जितकी खरी तितकीच या माहितीशिवाय वाङ्मयीन आकलन शक्य नसते ही दुसरी गोष्टसुद्धा खरी आहे. याची जाणीव वा. लं. नी सतत बाळगली आहे. 'टीकाकार वा. ल. कुळकर्णी' या लेखात मी यापूर्वीच त्यांच्या अशा परिशिष्टांचे महत्त्व नोंदविलेले आहे. त्या दृष्टीने त्या पुस्तकातील 'नाटककार खाडिलकरांचा काळ : मराठी नाट्यसृष्टी' या परिशिष्टाकडे एकवार मी लक्ष वेधू इच्छितो. या परिशिष्टात खाडिलकरांच्या अवतीभवती असणारी मराठी नाट्यसष्टी, खाडिलकरांची नाटके आणि त्यांच्या जीवनचरित्रातील प्रमुख घटना यांची संगती जुळवून दिलेली आहे. हे सारेच काम वा. लं. नी नऊ पृष्ठांत आटोपलेले आहे. सामान्यत्वे आमचे लेखक चरित्ररेषेच्या निमित्ताने व खाडिलकरपूर्व रंगभूमी, त्यांच्या समकालीन असलेली रंगभूमी; समजावून सांगण्याच्या निमित्ताने या दहा पानांतील मजकूर सांगण्यासाठी पाऊणशे पाने सहजच खातात व रेखीवपणे काहीच सांगत नाहीत असा अनुभव आहे. वा. लं. च्या ग्रंथातील काही परिशिष्टे आकलनाच्या दृष्टीने फार मला महत्त्वाची वाटतात. (खाडिलकरांच्या बाबत त्यांनी दिलेल्या परिशिष्टापेक्षा वामन मल्हार विषयक परिशिष्ट अत्यंत व्यापक पायावर आधारलेले आहे, ही एक बाब आणि कोल्हटकरांच्या ग्रंथाला असे परिशिष्ट लावण्याची गरज वा. लं. ना वाटली नाही ही दुसरी बाब, ह्या दोन्ही बाबी चिंतनीय आहेत. वामन मल्हारांचे परिशिष्ट अतिशय व्यापक पायावर रचणे आवश्यक होते. कारण वामन मल्हारांच्या आकलनासाठी मिल व मार्क्स थोडाफार माहीत असावा लागतो, इब्सेनच्या नाटकाचा इंग्लंडमध्ये पहिला प्रयोग केव्हा झाला येथपासून ते सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपर्यंतच्या बाबी समजून घ्याव्या लागतात. खाडिलकरांचे आकलन करण्यासाठी शेक्सपिअरसुद्धा नोंदविण्याची गरज पडत नाही. त्याची मराठी भाषांतरे नोंदविली म्हणजे काम भागते. वामन मल्हारांचे आकलन आणि खाडिलकरांचे आकलन यांतील हा फरक दोघांच्याही वाङ्मयात व्यक्त झालेल्या अनुभवांच्या कक्षांची व्याप्ती पुरेशी

नाटककार खाडिलकर/ ५७