पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्रिकोणात खाडिलकरांच्या नाटकांतील नाट्य, या नाटकाचे वाङ्मयीन मूल्य, या नाटकाचे सामर्थ्य, मर्यादा, या नाटकाची प्रकृती, या बाबी कैद होऊन पडलेल्या होत्या.
  संपूर्ण खाडिलकरांच्या नाटकांचे वाङ्मयीन भूमिकेवरून केलेले सविस्तर विवेचन वा. लं. च्या ग्रंथामुळे प्रथमच उपलब्ध होत आहे, हा या ग्रंथाचा एक महत्त्वाचा विशेष म्हणता येईल.

वाङ्मयीन भूमिकेवर भर
  हे मूल्यमापन करीत असताना खाडिलकरांची कथानके, खाडिलकरांचे नायक, खाडिलकरांचा विनोद, त्यांची शैली अशी चांगल्या व वाईट नाटकांना एका दावणीत बांधून चिरफाड करणारी मीमांसा वा. लं. नी केली नाही. ही गोष्ट मला स्वतःला फार आवडली. एकीकडे 'सत्त्वपरीक्षा' आणि 'सावित्री' या नाटकांतील अत्यंत रसभंगकारक व कलाहीन विनोद, दुसरीकडे 'भाऊबंदकी' तील मूळ नाट्याला नवे परिमाण देणारा अगर 'मानापमान'मधील सर्व नाट्याभासाला व्यापणारा खाडिलकरांचा विनोद यांना एका दावणीत बांधून वाङ्मयीन रहस्याचा शोध फारसा लागण्याची शक्यता नव्हती. एकेक कलाकृती समग्र म्हणून पाहणे व कलाकृती म्हणून तिच्याविषयी प्रतिक्रिया नोंदविणे या मार्गानेच खाडिलकरांच्या वाङ्मयाचा अभ्यास अधिक मर्मग्राही होऊ शकतो. वा. लं. नी त्यांच्या उपजत मार्मिकपणाने व रसिकतेने हे हेरले आहे. कथानकाचे सारांश, कथानकाची प्रवेशवार मांडणी, प्रत्येक कथानकातील कच्चे-पक्के दुवे यासारख्या प्रश्नांची चर्चा वा. ल. करीत बसत नाहीत. एक कलाकृती म्हणून त्या नाटकाविषयी आपल्या प्रतिक्रिया नोंदवून त्यांनी जितके यशस्वी वाङ्मयीन मूल्यमापन केले आहे, तितके यश एकाही मराठी नाटककाराच्या आजवर झालेल्या मूल्यमापनाला आलेले नाही ही गोष्ट मान्य केली पाहिजे. मराठीत नाटककारांची मूल्यमापने करणारी पुस्तके थोडी नाहीत. या पुस्तकांशी वा.लं.च्या 'खाडिलकरांची तुलना आपण करू लागलो म्हणजे या जागी फरक जाणवतोच. हा फरक प्रामुख्याने निकोप वाङ्मयीन दृष्टी आणि अस्सल रसिकता यांमुळे पडलेला आहे; पण या फरकाला विवेचन पद्धतीही उपकारक झाली आहे.

५६ / रंगविमर्श