पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिसळलेला असला तरी, या दोन वर्तुळांची दोन भिन्न केंद्रे आहेत हे विसरता येणार नाही. वा. लं. च्या विवेचनात अशी गल्लत कोठेही झालेली नाही. प्रयोगाविषयी अधूनमधून माहिती देणे त्यांना कठीण होते असे नव्हे, तर आपण वाङ्मयीन मूल्यमापनाला बसलो आहोत, या त्यांच्या भूमिकेवरची त्यांची पकड पक्की असल्यामुळेच त्यांनी हे कटाक्षाने टाळले आहे आणि हे असे झाले आहे हेच योग्य आहे.

समकालीन राजकारणाचा संदर्भ
  खाडिलकरांच्या मूल्यमापनाला अडथळा करणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाटकांना असणारा वर्तमानकालीन राजकारणाचा संदर्भ होय. 'कीचक वध' या नाटकाचे विवेचन सुरू झाले की तत्कालीन राजकारणात जहाल आणि मवाळ हे गट कसे होते, त्यांचे पडसाद या नाटकावर कसे उमटले आहेत, 'कीचक' पाहत असताना त्या वेळच्या प्रेक्षकांना कर्झन कसा दिसत असे, हे विवेचन सुरू होते. 'भाऊबंदकी'च्या विवेचनात सुरत काँग्रेस व त्यात झालेले भांडण या विषयीचे विवेचन, 'विद्याहरण' मदिरापान, त्याच्या विरोधी करण्यात आलेला प्रचार व या संदर्भात कोल्हटकरांचे 'मूकनायक' व गडकऱ्यांचा ‘एकच प्याला' यांच्याशी उत्कृष्ट प्रचाराच्या दृष्टीने तुलना, असे अनेक फाटे खाडिलकरांवरच्या विवेचनाला फुटत असतात. एका समीक्षकाने तर त्या काळात प्रयोगांचे उत्पन्न किती होते याविषयीची आकडेवारीसुद्धा परिश्रमपूर्वक गोळा करून उद्धृत केली आहे. या सर्व पसाऱ्यात वाङ्मयीन मूल्यमापन जर लुप्त झाले असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

बांधीव कथाकथन
  खाडिलकरांच्या नाटकांचे मूल्यमापन करण्याची तिसरी तन्हा म्हणजे या नाटकांचे कथाकथन कसे बांधीव व चिरेबंद असते याचे विवेचन. खाडिलकर नाटक लिहीत असताना त्यात नटांच्या अभिनयासाठी कसा मोकळा वाव सोडीत याचेही मग विवेचन होई. एकीकडे 'स्वयंवरातील- 'खडा मारायचा झाला तर' या प्रवेशाला बालगंधर्व हटकून टाळी कशी मिळवीत याची गहिवरलेली स्मृती, दुसरीकडे खाडिलकर हे कसे राजकारणी द्रष्टे होते याविषयीचे विवेचन आणि तिसरीकडे त्यांच्या नाटकांची कादंबरीप्रमाणे कथानकदृष्ट्या केलेली पाहाणी, या

नाटककार खाडिलकर/ ५५