पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून वा. ल. कुलकर्णी यांच्यासारख्या टीकाकाराचे लेखन खाडिलकरांची तपासणी करताना जसे यशस्वी झाल्यासारखे वाटत नाही म्हणूनच खाडिलकर हा फार चांगला विषय वा. लं. ना मिळाला असे वर म्हटले आहे. हीच गोष्ट वा. लं. नी केलेल्या 'पण लक्षात कोण घेतो?' यासारख्या कलाकृतीच्या रसग्रहणाच्या वेळी आणि 'मुक्तामाले'सारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या कादंबरीविवेचनाच्या वेळीही ध्यानात येते. जे ठिकाण वा. लं. च्या रसिकतेला आव्हान देत असते, आवाहन करीत असते तिथे वा. लं. ची सर्व सामर्थे उफाळून येतात.

मूल्यमापनात सरभेसळ
  खाडिलकरांवर मराठीत कमी लिहिले गेले असे नाही. लेख सोडून दिले तरी यापूर्वी निदान तीन पुस्तके तरी खाडिलकरांवर लिहिली गेलेली आहेत. त्यातील एक तर फडके यांच्यासारख्या आपल्या काळात महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या टीकाकाराने लिहिलेले आहे; पण आजवरचे खाडिलकरांचे झालेले सर्व मूल्यमापन आपण पाहू लागलो म्हणजे त्यांत विविध प्रकारची सरभेसळ आढळून येते. खाडिलकरांच्या नाटकाचे अतिशय रंगलेले प्रयोग त्या नाटकाच्या मूल्यमापनावर परिणाम करताना आढळतात. 'देवांना म्हातारपण येत नसते तशी मराठी रंगभूमीवरील काही चिरतरुण असणारी नाटके आहेत.' ज्यांत 'सौभद्र' आणि 'संशय कल्लोळ' यांच्या बरोबरीचा मान 'मानापमान' चा आहे. हे मूल्यमापन मानापमानाच्या प्रयोगमूल्यांच्या दृष्टीने ठीक असले तरी कलाकृती म्हणून या मूल्यमापनाला काही अर्थ नाही. कारण या मूल्यमापनात गाण्याची माधुरी, गायक नट, नाट्य संगीत आणि वाङ्मयीन मूल्य यांची सरभेसळ झालेली आहे. 'स्वयंवर' नाटक एके काळी मराठी रंगभूमीवर असेच गाजलेले नाटक होते. बालगंधर्व म्हातारे झाले आणि मग हे नाटकही मागे पडले. एखादा नट डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेल्या नाटकाची गत ही अशीच व्हायची. हे मूल्यमापनही पुन्हा प्रयोग व वाङ्मयीन मूल्ये यांत घोटाळा करणारेच आहे.
  खरोखरी नाटकाचा प्रयोग, त्याची रंगत व तो प्रयोग यशस्वी ठरण्याची कारणे यांचा विचार आणि एक कलाकृती म्हणून नाटकाचा विचार, या दोन विचारांतील वर्तुळांचा काही प्रदेश एकत्र दिसत असला तरी, तो परस्परांत

५४/ रंगविमर्श