पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून नंतर वारलेले दिसतात. शेठ प्रेमचंदांच्या मृत्यूनंतर भीमाबाई लवकरच वारल्या असाव्यात. म्हणजे भीमाबाईंचा मृत्यू त्यांनी नुकतीच पंचेचाळीशी ओलांडली त्यानंतर झालेला दिसतो. भीमाबाई मरणकाळी फारशा वयस्क नसाव्यात. तिसरी बहीण मैनाबाई. त्या भीमाबाईच्या मागोमाग काही वर्षांनी मुंबईतच आलेल्या होत्या. पुढच्या जीवनात त्यांचा पत्ता लागत नाही. हिराबाईंच्या पडत्या काळात मैनाबाई आणि सर्वांत धाकटी बहीण जिजाबाई ह्याही हयात नव्हत्या असे अनुमान काढले, तर आपण सत्यापासून फार दूर आहोत असे समजू नये. चौघी बहिणींची कहाणी आपण नीट समजून घेतली तर चौघींचेही मृत्यू पन्नाशीच्या आतच झालेले दिसतात. यात सेवंतुबाई सर्वांत कमी जगल्या. त्या विशीच्या आतच वारल्या.

जन्म
  या वातावरणात एका कलावंत घराण्यात राम देवल यांच्यापासून २२ नोव्हेंबर १८८५ ला सावंतवाडी या ठिकाणी हिराबाई पेडणेकरांचा जन्म झाला. आई वारली आणि आईचे आश्रयदातेही वारले म्हणून ही गोविंद बल्लाळ देवलांची पुतणी मुंबईला आपली मावशी भीमाबाई यांच्याकडे राहण्यासाठी आली. गोविंद बल्लाळ देवल हे अशा प्रकारे हिराबाईंचे चुलतेही होते आणि त्यांच्या मावशींचे घनिष्ठ मित्रही होते. कलावंत समाजात असली नाती अत्यंत प्रामाणिकपणे जपलेली आढळतात आणि अशा प्रकारची नाती या समाजात उधळली गेलेलीही आढळतात. मावशी सुस्थितीत असल्यामुळे हिराबाईंचे जीवन निराळ्या प्रकारचे झालेले आहे. हा त्यांच्या जीवनाचा निराळेपणा वेगवेगळ्या कारणांच्यामुळे निर्माण होतो हे आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे.

शिक्षण
  यातील एक निराळेपणा हिराबाईंच्या शिक्षणामुळे निर्माण झालेला आहे. भीमाबाईंनी हिराबाईंना शाळेत घातले. हिराबाई या सातवीपर्यंत शिकल्या असा अंदाज आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शेंसविधी झाला. हा विधी झाल्यानंतर हिराबाई फारशा शाळेत गेलेल्या नसाव्यात. म्हणजे इयत्ता सातवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतच झाले होते असे मानावे लागते. त्या मराठी शिकलेल्या होत्या. लिहिण्यावाचण्याची आवड त्यांना बालपणीच निर्माण झालेली

हिराबाई पेडणेकर : एक टिपण / ५१