पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. पुढे चालून हिराबाईंनी आपले शेवटचे यजमान नेने यांच्या मुलाला तर्खडकरांच्या इंग्रजी भाषांतरपाठमालेचे दोन भाग शिकवलेले होते. विशेषतः तर्खडकरांचा दुसरा भाग पुरेसा कठीण आहे. हिराबाईंना कामापुरते इंग्रजी येत होते असा याचा अर्थ आहे. हे त्यांचे इंग्रजीचे शिक्षण त्यांच्या शालेय जीवनातच झालेले असेल असे नाही; पण इंग्रजी शिक्षणाला शालेय जीवनात आरंभ झाल्यानंतर पुढेही त्यांनी हे शिक्षण चालू ठेवलेले दिसते. तेव्हा चांगल्यापैकी ज्ञानजिज्ञासा हिराबाईंच्या ठिकाणी होती असे मानावयास हरकत नाही. हिराबाई भीमाबाईंच्याकडे राहत. शेठ प्रेमचंद यांच्या म्हातारपणापासून भीमाबाईंच्याकडे अनेक मित्रांचे जाणे-येणे वाढलेले होते. गो. ब. देवल हे भीमाबाईंचे चाहते आणि घनिष्ठ मित्र होते; पण त्याबरोबरच दामोदर गणेश पाध्ये यांचेही भीमाबाईंकडे पुष्कळ जाणेयेणे आणि दळणवळण होते. दा. ग. पाध्ये या काळात नुकतेच तिशी ओलांडलेले तरुण होते. पाध्ये वारले त्या वेळी ते सुमारे सत्त्याहत्तर वर्षांचे होते. म्हणून ते नेहमीच म्हातारे आणि वृद्धावस्थेतच होते असे मानण्याचे कारण नाही. हिराबाईंशी संबंध आला तेव्हा ते तिशीतील तरुण होते. त्यांच्या तारुण्याचा काळ १८९७ च्या सुमाराला येतो. पुढे चालून पाध्ये रावबहादूर झाले; पण ज्या काळात भीमाबाईंकडे त्यांचे जाणेयेणे वाढले तो काळ रावबहादूरपणाचा नाही. ऐन तिशीपस्तीशीतले पाध्ये रावबहादूर नव्हते, पण प्रार्थना समाजाचे सदस्य, मुंबईच्या स्कूल कमिटीचे चिटणीस, इंदुप्रकाश' या नियतकालिकाचे संपादक असे पाध्ये भीमाबाईंचे चाहते होते. पाध्ये यांचे भीमाबाईंकडे जाणे-येणे बहुतेक १८९५ नंतरचे आहे. देवल आणि पाध्ये भीमाबाईंचे निकट मित्र म्हणून जवळजवळ समकालीन आहेत. भीमाबाईंच्याकडे येणारे तिसरे प्रमुख गृहस्थ येंदे शेठजी होत. हेही वाङ्मयाचे चाहते व प्रकाशक होते. भीमाबाईंचे घर देवल, येदे, पाध्ये या वाङ्मयाशी संबंध असणाऱ्या जाणत्या शहाण्या माणसांनी भरलेले होते. या वातावरणाचा हिराबाईंच्यावर दाट संस्कार झाला हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. भीमाबाईंच्या या तीनही मित्रांना शेठ प्रेमचंदांचा आक्षेप नव्हता, याची आपण नोंद घेतली पाहिजे. वाङ्मयाचा हा संस्कार हिराबाईंच्या निराळेपणाचा एक दिशादर्शक ठरला आहे. .

५२ / रंगविमर्श