पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केव्हापासून राहू लागल्या याची नक्की माहिती कुठे उपलब्ध नाही; पण स्थूलमानाने या बाबतचा विचार आपल्याला करता येतो. हिराबाईंचा जन्म इ.स. १८८५ चा आहे. हिराबाई राम देवल यांच्या कन्या असाव्यात. राम देवलांचा मृत्यू इ.स. १८८५ चा आहे. याचा अर्थ असा की हिराबाईंच्या ज्या भावाचा उल्लेख येतो तो त्यांच्यापेक्षा वडील असला पाहिजे. राम देवलांच्या निधनानंतर हिराबाईंची आई फार काळ जिवंत राहिलेली दिसत नाही. देवलांचा आणि सेवंतुबाईचा संबंध शेवटची ५-७ वर्ष होता आणि सेवंतुबाई आधी नायकिणीचा व्यवसाय करून मग राम देवलांच्या आश्रयाला आल्या. यावरून अनुमान करायचे तर असे करता येईल की राम देवल मृत्यूच्या वेळी ३५ च्या आसपास होते. सेवंतुबाई २५ च्या जवळपास होत्या. त्यांच्यापेक्षा भीमाबाई दोन वर्षांनी धाकट्या होत्या, तर भीमाबाई शेठ प्रेमचंद यांच्यापेक्षा सुमारे तीस वर्षांनी धाकट्या असाव्यात. शेठजी पन्नाशीत असताना आणि भीमाबाई विशीत असताना हा संबंध आला असावा. हा काळ इ.स. १८८२ च्या आसपासचा येतो. भीमाबाई शेठ प्रेमचंद यांच्या आश्रयाने राहत, पण त्यांचा देवलांशीसुद्धा निकट संबंध होता. हा संबंध इ.स. १८८७ नंतर अधिक घनिष्ठ झाला. थोडीशी आकडेमोड केली तर देवलांनी चाळीशी ओलांडलेली होती असे अनुमान काढता येते. या चाळीशी ओलांडलेल्या रामदेवलांचे बंधू गोविंद बल्लाळ देवल यांचा आणि भीमाबाईंचा घनिष्ठ स्नेहसंबंध शेठ प्रेमचंद पासष्ट वर्षांचे झाल्यानंतर आणि भीमाबाई या तिशी-बत्तीशीत आल्यानंतर जुळलेला दिसतो.
  चौघी बहिणीतील सर्वांत वडील बहीण सेवंतुबाई नायकिणीचा व्यवसाय करी. नंतर ती राम देवलांची आश्रित झाली. इ.स. १८८५ साली राम देवलांच्या मृत्यूनंतर सेवंतुबाई काही वर्षांत लवकरच वारल्या असाव्यात; पण त्यांनी व्यवसायाला आरंभ केलाच नसेल अशी खात्री देता येत नाही. नायकिणीचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया काही काळ तो व्यवसाय करून नंतर एखाद्या आश्रिताकडे राहायला जात किंवा एकाचा आश्रित म्हणून जीवनारंभ करून पुढे दुर्दैववशात, कधीकधी नायकिणीचा व्यवसायही त्यांना करावा लागे.
  भीमाबाई शेठ प्रेमचंदांच्या आश्रित होत्या, पण शेठजीचा आश्रय चालू असला तरी त्यामुळे गोविंद बल्लाळ देवलांशी घनिष्ठ स्नेहसंबंध ठेवण्यास त्यांना प्रत्यवाय आलेला दिसत नाही. शेठ प्रेमचंद इ.स. १९०७ साली वारले. यापूर्वीच हिराबाई जोगळेकरांच्याकडे राहू लागलेल्या होत्या. शेठजी पंच्याहत्तरीला स्पर्श

५० / रंगविमर्श