पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गाठावा, त्याच्याबरोबर निष्ठेने जन्मभर रखेली म्हणून राहावे, अनुभव वाईट असेल तर यजमान बदलावा असे ह्यांचे आयुष्य. काहीजणी सरळ व्यवसाय करीत. देहविक्रय या व्यवसायाला वेगवेगळ्या पद्धतीने वाहिलेल्या या जातीजमातीत गीतनृत्याची उपासना खूपच मोठी होती. महाराष्ट्रातील अत्यंत आदरणीय व थोर अशा अनेक गायिका या कलावंत जातीपैकी आहेत. गेल्या पिढीतही होत्या. या समाजातील पुरुष हे वाद्यवादन करणे, गिहाइके गाठणे, मध्यस्थी करणे असा व्यवसाय करीत. असा एक कलावंत समाज हे आमच्या समाजरचनेचे एक वास्तव रूप होते.

हिंदू समाजरचना
  या कलावंत समाजातील स्त्रियांचे नृत्यगान क्षेत्रातील नैपुण्य पाहून त्यांना राजरोसपणे रखेली म्हणून घेणारे यजमानही पन्नास वर्षांपूर्वी विपुल प्रमाणात पाहावयास मिळतात. त्यात चोरण्याजोगे काही आहे असे तत्कालीन समाजाला देखील वाटत नाही. आधुनिक शिक्षण मिळालेला नवशिक्षित तरुणही या प्रथेचा लाभ घेतच होता, चोरूनही संबंध ठेवीत होता, या रूढीचा निषेधही करीत होता आणि आकृष्टही होत होता. या कलावंत समाजातील काही स्त्रिया जुनी भाषा सोडून नव्या भाषेतही बोलत होत्या. हिराबाईंच्या चरित्राला ही एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. या पार्श्वभूमीचा संदर्भ लक्षात घेतला तर गुन्हेगार असलीच तर हिंदूंची समाजरचना आहे, हिराबाई नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.

पूर्ववृतान्त
  सावंतवाडीपासून जवळ असणाऱ्या पेडणे नावाच्या गावी एक कुटुंब राहत होते. या कलावंत कुटुंबात चार मुली जन्माला आल्या. शेवंताबाई, भीमाबाई, मैनाबाई आणि जिजाबाई अशी त्या मुलींची नावे होती. आपले नशीब काढण्यासाठी या चार मुली सावंतवाडी येथे येऊन राहिल्या. या चौघीजणींपैकी एक भीमाबाई मुंबईला आली. प्रसिद्ध व्यापारी शेठ प्रेमचंद रायचंद (जन्म १८३१, मृत्यू १९०७) यांनी तिला आश्रय दिला. शेठ प्रेमचंद हे अतिशय धनाढ्य गृहस्थ होते. ते संगीताचे चाहते होते. त्यांनी भीमाबाईला पैसाही खूप दिला. भीमाबाईच्या जीवनाला स्थैर्य आणि समृद्धी याची जोड मिळाली ती प्रेमचंद ह्यांच्यामुळेच.
  भीमाबाई यांचा जन्म केव्हा झाला आणि त्या शेठ प्रेमचंद यांच्या आश्रयाने

रं....४
हिराबाई पेडणेकर : एक टिपण / ४९