पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होणार नाही. गंधारग्राम गाईला जात असता तर तो नष्ट होण्याचे काही कारणच नव्हते, कारण गंधार ग्रामापेक्षा उंच ठिकाणाहून सुरू होणारा मध्यमग्राम पृथ्वीतलावरील लोक गातच होते. गंधारग्राम हा संकेतमात्र आहे. तो गानशैलीचा वास्तविक प्रकार नव्हे. यक्षगान नाट्यातील गायक यांचा गंधारग्रामाशी काही संबंध मानणे मुळातच चुकीचे आहे. तारस्वरात गाणारे षड्जग्रामिक असू शकतात. तारषड्ज षड्जग्रामातलाच आहे. म्हणून याबाबत कारंतांच्या विवेचनाला काही ऐतिहासिक आधार आहे असे वाटत नाही.
 प्रा. भवाळकरांनी अतिशय मार्मिकपणे भावे यांचे नाटक त्यांच्याबरोबरच संपले अशी नोंद केली आहे. खरे म्हणजे असे म्हणावयास हवे की भावे यांचे नाटक हा सुधारित दशावतारी खेळाचा प्रयोग होता. हा सुधारित दशावतारी खेळ किर्लोस्करी रंगभूमीच्या जन्मानंतर संपला. भावे यांच्यापूर्वी आणि किर्लोस्करांच्यानंतर दशावतारी खेळांचे अस्तित्व लोकरंगभूमीवरच राहिले. अभिजात रंगभूमीवर काही काळपर्यंत दशावतारी मान्य झाले आणि नंतर मागे पडले. शिष्ट रंगभूमीवर दशावतारी खेळांचा आविष्कार म्हणजे भावे यांचे नाटक यापेक्षा मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांचे स्थान वेगळे समज़ता येणार नाही.
किर्लोस्करी रंगभूमी
 पण किर्लोस्कर रंगभूमीच्या तरी प्रयोगाचे स्वरूप काय आहे ? किर्लोस्करी रंगभूमी भजने, गवळणी आणि लावण्या, साक्या, दिंड्या हे संगीत स्वीकारते. थोडक्यात म्हणजे या रंगभूमीचे संगीत कीर्तनपरंपरा व शाहिरी परंपरेचे संमिश्र वारसदार आहे. काही प्रमाणात अभिजात संस्कृत नाटक, काही प्रमाणात दशावतारी खेळ आणि काही प्रमाणात बुकिश नाटकांच्याद्वारे परिचित झालेले इंग्रजी नाटक ह्यांची सरमिसळ करीतच किर्लोस्करी रंगभूमीची प्रयोगपद्धती निर्माण होते. विष्णुदास भावे ह्यांच्या नाटकातील काही अंश मागे पडले त्याऐवजी संस्कृत व इंग्रजी नाटकाचे अंश पुढे आले व किर्लोस्करी नाटक निर्माण झाले. प्रयोग म्हणून भावे, त्रिलोकेकर आणि किर्लोस्कर अशी क्रमाने परिणत अवस्था मानावी हे अधिक योग्य होईल, की किर्लोस्करांपासून नवा आरंभ मानणे योग्य होईल याबाबत सगळेच निर्णय नाटक संहिता पाहून देणें

यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा / २९१ :