पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. ही आरती कानडीत आहे असे त्यांचे मत आहे. ती मराठीतच आहे असे त्या आरतीतील शब्द सांगतात. ती आरती डोळ्यांसमोर ठेवून तिला कानडी का म्हणावे याचा मी पुष्कळ विचार केला, पण मला या आरतीला कानडी म्हणण्याचे कारण सापडले नाही. महाराष्ट्र क्रमाक्रमाने कसा वसत गेला याबाबत प्रा. भवाळकरांना इतिहासाचार्य राजवाडे यांच्या 'राधामाधव विलासचंपू' या ग्रंथातील प्रस्तावनेचा आधार पुरेसा वाटतो. इतिहासाचार्य राजवाडे हे प्रतिभाशाली विवेचक होऊन गेले, पण ते कित्येकदा त्या विशिष्ट वेळी डोक्यात आलेल्या विचारांना निर्णायक इतिहास समजत असत. आपण राजवाड्यांचे विवेचन विचारप्रवर्तक मानणे बरे असते, त्याला विश्वसनीय समजायचे नसते, पण भवाळकरांनी इतक्या विविध प्रकारची माहिती एका सुसंगत सूत्रात गोळा केलेली आहे व काटेकोरपणे एकेक मुद्दा सिद्ध करीत त्यांनी आपले विवेचन क्रमाक्रमाने पक्के करीत आणले आहे की, असल्या किरकोळ मतभेदांपेक्षा त्यांनी दाखविलेल्या अभ्यासाच्या दिशा व त्यांनी केलेले विवेचन याबद्दल त्यांना धन्यवाद देणे न्याय्य होईल.
गंधारग्रामास संबंध नाही
 एक मुद्दा परंपरेवर विसंबून प्रथमतः डॉ. कारंत यांनी चुकीने मांडला आहे . आणि कारंतांच्या आधारे तीच चूक भवाळकरांनीही केलेली आहे. म्हणून त्याचा थोडासा खुलासा करणे भाग आहे. भारतीय परंपरेत षड्जग्राम, मध्यमग्राम आणि गंधारग्राम या तीन ग्रामांचा उल्लेख नेहमी येतो. गंधारग्राम हा गंधर्वाकडून स्वर्गात गाईला जातो. पृथ्वीवर हा ग्राम शिल्लक उरलेला नाही अशी अनेकांनी नोंदही केलेली असते. ही नोंद सांकेतिक आहे. षड्जग्राम षड्जापासून म्हणजे चौथ्या श्रुतीपासून सुरू होतो. या ग्रामातील गायक सतरावी श्रुती पंचम म्हणून गातात. मध्यम ग्राम तेराव्या श्रुतीपासून सुरू होतो. या ग्रामातील लोक सोळावी श्रुती पंचम म्हणून गातात. तिला अपकृष्ट पंचम म्हणतात. ही माहिती भरताने दिली आहे. भरताला गंधारग्राम माहीत नाही. त्याला दोनच ग्राम माहीत आहेत. गंधारग्रामातील गायन कधी अस्तित्वात नव्हते. गंधार हा लुप्त ग्राम आहे ही कल्पनाच भरतोत्तरकालीन आहे. गंधारग्राम हा नवव्या श्रुतीपासून सुरुवात होतो, तो मध्यमग्रामापेक्षा अतितारही असणार नाही आणि षड्जग्रामापेक्षा अतिमंद्रही

२९० / रंगविमर्श