पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंपरागत नाव दशावतार आता आहेच आहे, यामुळे कानडी यक्षगानाचा एक प्रभाव कोकणातील दशावतारीच्या रूपाने दिसतो, दुसरा भावे रंगभूमीच्या रूपाने दिसतो, असे जर आपण म्हटले तर मराठी नाटक कोकणातील दशावतारीपासून आले वा कर्नाटकातील यक्षगानापासून आले हा खोटा वाद लढवीत बसण्याची गरज पडणार नाही असे वाटते. किर्लोस्करपूर्व रंगभूमी म्हणजे फक्त विष्णुदास भावे यांची नाटक मंडळी नव्हे, इतरही अनेक नाटक मंडळ्या निर्माण झालेल्या होत्या. सर्वच नाटक मंडळ्यांनी काही कानडी प्रयोग पाहिलेले असणार नाहीत. त्यांच्यातील बहुतेकांच्या समोर कोकणातील दशावतारी खेळच असणार. कोकणातील दशावतारी खेळ आणि भावे ह्यांचे नाटक प्रयोगदृष्ट्या इतके एकसारखे होते की, कर्नाटकातून गोवा आणि दक्षिण कोकण तेथून महाराष्ट्रभर असा प्रवास सांगितला काय आणि कर्नाटकातून सांगली व त्या प्रेरणेने विष्णुदास भावे असे म्हटले काय दोन्हीचा अर्थ एकच होतो.
 भवाळकरांनी काही मुद्दे मांडताना थोडी अधिक काळजी घेतली असती तर बरे झाले असते असे मला वाटते. दशावतारी खेळात स्त्रियांची कामे नेहमी पुरुषच करीत असतात, असे त्यांनी म्हटलेले आहे. हे खरे आहे, पण ते दशावतारी खेळांचे वैशिष्ट्य नाही. ते सर्व भारतभरच्या लोकरंगभूमीचे वैशिष्ट्य आहे. अभिजात संस्कृत नाटक हा गणिकासंघाचा उद्योग आहे. तिथे स्त्रियांची कामे स्त्रिया करतात आणि पुष्कळदा पुरुषांचीही कामे स्त्रियाच करतात. लोकरंगभूमीवर मात्र अतिप्राचीन कालापासून स्त्रियांची कामे पुरुष करीत आलेले आहेत. स्त्री- भूमिका करणाऱ्या पुरुषनटाला अमरकोशात भूकंस म्हटले आहे. हा भ्रूकंस पतंजलीलाही ज्ञात आहे. स्त्री- भूमिका करणारे पुरुष नाट्यशास्त्राकारांनाही ज्ञात आहेत. भक्तिमार्ग आणि लोकरंगभूमी यांची सरमिसळ झाल्यानंतरच्या लोकरंगभूमीवर गणिकांना प्रतिष्ठा शक्य नव्हती. लोकरंगभूमीचे अनेक प्रकार पूजाप्रकार आहेत. म्हणून तिथे कुलीन स्त्रिया नाटकात नसल्यामुळे पुरुषांना स्त्री- भूमिका करणे भाग असे. पुरुष भूमिका करणाऱ्या स्त्रिया अभिजात रंगभूमीचा विशेष आणि स्त्री भूमिका करणारा पुरुष हा लोकरंगभूमीचा विशेष यात बदल झाला असेल तर इतकाच की, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जी अभिजात रंगभूमी जन्माला आली तिच्या दीर्घकाळपर्यंत स्त्रियांची कामे पुरुष करीत होते. भवाळकरांनी गोव्यात प्रचलित असणारी एक आरतीही नोंदवलेली

रं....१९
यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा / २८९