पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. प्रा. भवाळकरांनी हा मुद्दा पुरेशा पुराव्यांनी मांडलेला आहे. स्वतः विष्णुदासांचे मतसुद्धा असेच आहे की, कानडी नाटक मंडळी सांगलीस आली. तिचे प्रयोग ओबडधोबड आणि बीभत्स होते. श्रीमंतांचे मन त्यामुळे रिझले नाही. भावे ह्यांना आपला प्रयोग सुसंस्कृत आणि रेखीव वाटतो. यापेक्षा आपण काहीतरी वेगळे करीत आहोत असे वाटलेले दिसत नाही. यामुळे कन्नड देशातील यक्षगानपरंपरेचे नाटक आणि कोकणातील- विशेषतः दक्षिण कोकणातील दशावतारी खेळ या दोन्हीपेक्षा भावे यांची रंगभूमी फारशी निराळी नव्हती असे मानावे लागते.
 विष्णुदास भावे यांनी पुनः पुन्हा कानडी खेळांना ओबडधोबड आणि बीभत्स म्हणून हिणवलेले दिसते. दशावतारी खेळ हें हास्यकारक व बीभत्स प्रहसनेच आहेत. आपले नाटक मात्र नाट्यकला आहे असा भावे यांचा सूर आहे. यक्षगान ही नृत्य-नाट्य- शैली नृत्याच्या दृष्टीनेही अतिशय समृद्ध आणि संगीताच्या दृष्टीनेही अतिशय समृद्ध आहे. तिला ओबडधोबड म्हटल्याबद्दल भवाळकरांनी नापसंती व्यक्त केली आहे. यक्षगानातील समृद्ध नृत्य आत्मसात करून मराठी रंगभूमीवर आणणे भावे यांच्या शक्तीबाहेरचे होते असे भवाळकर म्हणतात. भवाळकरांच्या या नापसंतीच्या सुरांशी मला सहमत होता येत नाही. यक्षगानातील ज्या समृद्ध नृत्यसंगीताचा त्यांना ओढा आहे तो यक्षगानाचा नागर प्रकार आहे. शिष्टसंमत नागर यक्षगान आणि लोकपरंपरेचे यक्षगान यात काही फरक करायलाच हवा. विष्णुदासांच्या समोर जी कानडी नाटक मंडळी असण्याचा संभव आहे ती लोकपरंपरेची प्रथा अनुसरणारी असेल तर मग विष्णुदासांना समृद्ध नृत्य आणि समृद्ध संगीत प्रयोगात दिसण्याऐवजी ओबडधोबड धांगडधिंगाच दिसणार आणि आपण मात्र अधिक रेखीव सुसंस्कृत प्रयोग सादर करीत आहोत असा अभिमान भाव्यांना वाटणार हे स्वाभाविक आहे. भाव्यांच्यापासून महाराष्ट्रातील दशावतारी खेळ शिष्टमान्य आणि अधिक सुसंस्कृत होऊ लागले यालाच भावे 'नाट्यकला' म्हणत आहेत इतके तथ्य शिल्लक राहते.
कानडी यक्षगानाचा प्रभाव
 कोकणातील दशावतारी खेळही कर्नाटकातूनच आलेले आहेत. यक्षगानाचे

२८८ / रंगविमर्श