पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रंगभूमीवर नाट्यप्रयोगात राक्षसपात्राचे एक विशिष्ट महत्त्व असे. 'अल्लडूर' नाटके. अगर ‘तागडथोंब' नाटके म्हणून ज्या नाटकांचा उल्लेख किर्लोस्करपूर्व रंगभूमीचा विचार करताना आपण करतो या नाटकात राक्षसांचे महत्त्व केवळ कथानक पुराणातले आहे किंवा मनोरंजनाला राक्षस उपयोगी पडतात इतक्यामुळे नाही. यक्षगान प्रयोगातच राक्षस महत्त्वाचा होता म्हणून किर्लोस्करपूर्व रंगभूमीवरील नाटक, ज्याचा यक्षगान लोकपरंपरेच्या प्रयोगपद्धतीशी निकट अनुबंध आहे त्यात राक्षस महत्त्वाचा ठरला असे दिसते. म्हणजे राक्षसाचे प्राधान्य प्रेक्षकांच्या अडाणीपणामुळे येत नसून यक्षगान परंपरेमुळे येते असे म्हणावे लागेल.
 मला तर कधी कधी असेही वाटते की, सुभद्रेच्या कथानकात राक्षसाला जागा नसूनही किर्लोस्करांनी घटोत्कच रंगभूमीवर आणला. आपल्या नाटकात एकदा तरी राक्षस आणून नाचवला पाहिजे असे किर्लोस्करांना वाटले ह्याचे कारण कर्नाटकीय यक्षगानशैलीतील सुभद्राहरणाच्या नाट्यप्रयोगात असावे. कारण त्याही नाटकात एकदा राक्षस आलेलाच असणार.
दशावतारी खेळ
 इ.स. १८४३ साली सीतास्वयंवराचा पहिला प्रयोग विष्णुदास भावे यांनी सांगली येथे सादर केला. भावे यांची नाटकमंडळी इ.स. १८५१ पर्यंत सांगलीलाच प्रयोग करीत होती. नंतर त्यांनी सांगली बाहेर प्रयोगाला आरंभ केला. इ.स. १८६२ साली ही मंडळी बंद पडली. या १८-१९ वर्षांच्या काळात ही मंडळी जे प्रयोग करीत असे त्या प्रयोगाला समकालीन लोक दशावतारी खेळ असेच म्हणत असत. जर विष्णुदास भावे ह्यांच्या खेळांना समकालीन मंडळी दशावतारी खेळ म्हणूनच ओळखत असतील आणि आरंभीच्या काळी त्यांच्याही नाट्यप्रयोगाच्या शेवटी प्रेक्षकांच्यामधून आरतीचे तबक फिरत असेल तर मग कथानक आणि प्रयोगाचा प्रकार लक्षात घेता विष्णुदास भाव्यांचे नाटक हे दशावतारी खेळाची सुधारलेली आवृत्ती म्हटली पाहिजे. दशावतारी खेळांच्यामध्ये जसे वेगवेगळे अवतार येत असत; गणपती, सरस्वती आणि बाळगोपाळ रंगभूमीवर येत; हाच प्रकार जर भावे रंगभूमीवर असेल तर मग विष्णुदास भावे ह्यांचे नाटक म्हणजे दशावतारी खेळच होत असे म्हणणे भाग

यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा / २८७