पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा प्रवेश असतो. यक्षगानातसुद्धा गणपतिपूजनानंतर कृष्ण व बलराम या बाल-गोपालांचा प्रवेश व पाठोपाठ गोपींचा प्रवेश असतोच. यक्षगानाचा हा प्रयोग मोठ्या प्रमाणात गण-गौळणींशी मिळताजुळता आहे. आमच्या गण-गौळणींवरून यक्षगानाने काही उचल केली असे सुचवायचे नसून महाराष्ट्रातील लोककला आणि कर्नाटकातील लोककला ह्यांचा संबंध वाटतो त्याहून अधिक निकटचा आहे. यक्षगानपद्धतीच्या लोकनाट्यातील रूपांनी मराठी लोकनाट्याला खूप योगदान केलेले आहे असे मला म्हणायचे आहे.
विदूषकाऐवजी हनुमान
 यक्षगानात विदूषकाच्या ऐवजी हनुमनायक म्हणजे हनुमान असतो. या हनुमानाचे काही वानर साथीदार असतात. हा हनुमनायक विदूषकाचे काम करतो,. तसेच सूत्रधाराचेही काम करतो ही कल्पना आपण समजून घेतली पाहिजे. काही विद्वान अभ्यासकांचे असे मत आहे की, विदूषक हा नाट्यातील संकेत आहे. कारण तो फक्त नाटकातच असतो आणि हा संकेत राक्षस पात्राच्या विडंबनातून निर्माण झाला असावा. हे विवेचन मान्य करण्यात अडचण अशी आहे की, दण्डीच्या दशकुमारचरितात गणिकांचे नोकर विदूषक असत असा उल्लेख आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात विदूषक या प्रत्यक्ष जीवनातील व्यवसायाचा उल्लेख आहे आणि कुहक म्हणजे विनोद करून हसविणारे नोकर कौटिल्याला ज्ञात आहेत. विदूषक हा नाट्यसंकेत नसून नाटकाच्या बाहेरही आहे. तो नायकाचा साथीदार नोकर असतो म्हणूनच निष्ठावंत सेवक या नात्याने पेंद्या विदूषक होतो. हनुमानही विदूषक होऊ शकतो ( यक्षगानात). रामोपासक वैष्णवांच्या प्रभावांमुळे हनुमान हा सूत्रधार व विदूषक यांचे दुहेरी काम करणारा या नात्याने यक्षगानात आला असे माझे अनुमान आहे. यक्षगानाचा विचार करताना घटक म्हणून शैव-वैष्णव धर्मसंप्रदायांचे प्रभावसुद्धा पाहावे लागतील. नुसती नृत्यशैली पाहून चालणार नाही असे मला वाटते.
राक्षसपात्रे
 यक्षगानात राक्षसपात्रालाही खूप महत्त्व आहे. त्या राक्षसाचे नृत्य, त्याच्या डरकाळ्या, मशालीवर राळ टाकून ज्वाला प्रदीप्त करणे, 'चंडे' या वाद्याचे विशिष्ट प्रकारचे वादन ह्या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. किर्लोस्करपूर्व

२८६ / रंगविमर्श