पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकृतीची भूमी होतो आणि प्रकृती साकार करतो. नट प्रकृती होतो, परभाव स्वीकार करतो ही एक कल्पना आहे आणि नट स्वतः पात्र असतो, त्यात प्रकृती कुंभात मध भरावा त्याप्रमाणे भरली जाते म्हणून नट नावाचे पात्र जेवढे समर्थ असेल तेवढी प्रकृती समर्थ होते अशी दुसरी कल्पना आहे. या दोन कल्पनांची सरमिसळ पात्रधारी चर्चेतच सारखी चालू आहे. यक्षगानात पात्रधारी व अर्थधारी असे जे दोन शब्द येतात त्यामागे या दोन कल्पनांची मिश्रणे आहेत.
गणपतिपूजन
 यक्षगान प्रयोगातील गणपतिपूजन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या गणपतीला दक्षिणेत फार मोठे महत्त्व आहे. शंकर ही सर्व कलांची अधिष्ठात्री देवता. म्हणून आरंभी शंकराचे वंदन असावे ही उत्तरेची अतिशय सर्वमान्य अशी कल्पना आहे. संस्कृत नाटकात अपवाद वगळता प्रायः नांदीत शिवस्तुती असते. किर्लोस्करांनी ही शिवस्तुती संस्कृतपरंपरेने पत्करलेली आहे. अलीकडील मंडळी प्रयोगापूर्वी पडद्याच्या आतच नटराज म्हणून शंकराला नमस्कार करतात, पण मराठी लोकपरंपरेत दक्षिणेप्रमाणे गणपतिपूजन आहे. लावणी, तमाशा, वग यांपूर्वी गण-गौळण असते. त्यातील गणात गणपतीचीच स्तुती असते. यक्षगानात असणारे गणपतिपूजेचे महत्त्व हा दक्षिणेच्या लोकपरंपरेचा भाग आहे जो पुढे शिष्टमान्य ठरला. महाराष्ट्रातील लोकरंगभूमी गणपतीला महत्त्व देणारी आहे याचे कारण या लोकरंगभूमीचे उगम दक्षिणेच्या कलापरंपरांशी जोडलेले आहेत. महाराष्ट्रात उत्तरेत उमग असणाऱ्यांचा दक्षिणी आविष्कार होतो. दक्षिणेत ज्यांचा उगम आहे त्याचा उत्तरी आविष्कार होतो. उत्तरेतील वैष्णवांच्या गौळणी दक्षिणेतील गणपतिपूजनासह गण-गौळण म्हणून एकत्र येतात. महाराष्ट्राच्या सर्व लोकपरंपरेत हे जे दक्षिण व उत्तरेचे मिश्रण आहे त्याचे स्वरूप अतिशय संकुल आहे. विश्लेषण करताना या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
गण-गौळणीशी साम्य
 भरतनाट्यशास्त्रात नाट्यप्रयोगाच्या आरंभी नांदीच्या नंतर सूत्रधार - विदूषक यांचा एक विनोदी असा प्रवेश होत असल्याचा उल्लेख आहे. यक्षगानाच्या आरंभी हनुमनायक आणि त्याचे साथीदार भागवताबरोबर हास्यविनोद करतात

यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा / २८५