पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले असे म्हणावे लागते, पण डॉ. शिवराम कारंत पुरावा म्हणून तंजावरी नाटके अगर विष्णुदास भाव्यांच्या नाटकांचे यक्षगानाशी मिळतेजुळते स्वरूप याचा उल्लेख करीत नाहीत. ज्या मुद्द्याचा पुरावा म्हणून ते उल्लेख करतात तो मुद्दा । स्वीकारता येण्याजोगा नाही.
यक्षगान व मराठी नाटक- समान राग
 डॉ. कारंत म्हणतात की, मराठी नाटके आणि यक्षगान या दोहोंतही राग समान आहेत. समान राग असणे म्हणजे संगीत समान असणे नव्हे. दक्षिण आणि उत्तरेच्या संगीतपरंपरेत रागांची नावे समान असली तरी गायन भिन्न असते. राग आणि गायन दोन्ही समान असले तरी दाक्षिणात्य संगीत फक्त कर्नाटकापुरते मर्यादित होते. तसेच पाहिले तर मराठी रंगभूमीवरील संगीत एक तर लावण्या-भजनांचे म्हणजे मराठी लोकपरंपरेचे होते आणि पुढे या रंगभूमीवर उत्तरी संगीत शैलीचेच वर्चस्व राहिले. रागांची नावे समान आहेत हा पुरावा रंगभूमीच्या निर्मितीसाठी उपयोगी पडणारा व पुरेसा असणारा पुरावा नाही. यक्षगानशैलीत सरळ भरतनाट्यशास्त्रातून काय काय येते याचाही एकदा विचार व्हायला हवा. कारण भरतनाट्यशास्त्रातून निरनिराळ्या कल्पना उचलताना ही शैली क्रमाने नागर होत जाणार आहे, या दृष्टीने काही शब्दांच्याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. नाट्यप्रयोगात संपूर्ण यक्षगानकाव्य कंठस्थ करून ते राग-तालावर गातात त्यांना भागवत असे म्हणतात. संपूर्ण काव्य नाट्यप्रयोगात काही ठराविक मंडळीने गायचे हे भरतनाट्यशास्त्रातील नाटक नव्हे. या गायकांना भागवत म्हणायचे हीही नाट्यशास्त्रपरंपरा नव्हे.
नाट्यशास्त्राची परंपरा
 पण नटाला अर्थधारी आणि पात्रधारी असे जे दोन शब्द आहेत ते मात्र नाट्यशास्त्राच्या परंपरेने येतात. नाट्यशास्त्रात नाट्यार्थ ही कल्पना आहे. हा नाट्यार्थ धारण करणारे अर्थधारी आहेत. नाट्यशास्त्रात पात्र ही कल्पनाही आहे, पण पात्र म्हणजे नट पात्रधारी म्हणजे नट ही कल्पना थोडी निराळी आहे. नाट्यातंर्गत व्यक्तीला पात्र म्हणावे म्हणजे नटाला पात्रधारी म्हणता येते. मुळात संस्कृत नाट्यचर्चेतच दोन भिन्न कल्पना एकमेकीत मिसळलेल्या आहेत. नाटकातील व्यक्ती म्हणजे प्रकृती. नट स्वतःच्या रूपाचे आच्छादन करतो,

२८४/ रंगविमर्श