पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेकडो यक्षगानाचे प्रयोग होतात. लोककला म्हणून अस्तित्वात असणाऱ्या यक्षगानाची ही एक परंपरा आहे, पण त्याबरोबरच सोळाव्या शतकापासून यक्षगानाचे ग्रंथ उपलब्ध होऊ लागतात आणि त्याहीपूर्वी नृपतुंगाच्या 'कविराज मार्गा'त यक्षगानाचा उल्लेख आहे असे सांगितले जाते. ज्या शैलीत पंडित ग्रंथरचना करीत आहेत, ज्या शैलीत प्रतिष्ठित आचार्य शिक्षण देत आहेत, जी शैली राजदरबारी प्रतिष्ठित आहे ती नाट्याची नागरशैलीच म्हटली पाहिजे. यक्षगानाची ही एक पातळी आहे. नागर यक्षगान आणि यक्षगानाची लोककला यांना एकच समजता येत नाही. लोककलांच्यामधील जिवंतपणा अधिकृतपणे शास्त्राच्या चौकटीत सामावला जात नसतो. दरबार आणि शास्त्राची प्रतिष्ठा, पंडितांची मान्यता यांसह लोककलेची जनमान्यता व लोककलेला जनसामान्यांच्या जीवनात 'विधी' नाट्य म्हणून असणारी जनमान्यता या सर्वच बाबी यक्षगानाला एकाच वेळी लागू कशा होतील असा प्रयत्न डॉ. शिवराम कारंत करतात. कलावंताचे कलाप्रेम म्हणून या प्रयत्नाचे समर्थन करता येते. विचार करण्याची शास्त्रीय पद्धती म्हणून ही पद्धत मान्य करता येत नाही.
लोककला व नागरकला
 यक्षगानाचा विचार लोककला म्हणून निराळा केला पाहिजे आणि नागरकला म्हणून निराळा केला पाहिजे. तंजावरी नाटके, यक्षगानाच्या नागरपातळीवरील आविष्काराची उदाहरणे आहेत. विष्णुदास भावे यांच्या सीतास्वयंवरचा संबंध या शैलीतील लोकपरंपरेच्या प्रयोगाशी आहे हा भेद प्रा. भवाळकरांच्या विवेचनात जर स्पष्टपणे आला असता तर बरे झाले असते असे मला वाटते. पण ही प्रतिक्रिया या क्षेत्रांतील अतज्ज्ञ, सामान्य वाचकाची समजली पाहिजे. कारण मला माझ्या मर्यादांचे भान आहे. यक्षगानाबाबत अजूनही एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. तो असा की, नृत्य-नाट्य - शैली कर्नाटकापुरती मर्यादित नाही. कर्नाटक प्रदेशाच्या बाहेरही ही नाट्यशैली आहे म्हणून या नाट्यशैलीला प्रादेशिक नाट्यशैली असे म्हणता येईल काय, याहीबाबत काही विचार करणे आवश्यक आहे. यक्षगानपद्धतीपासून मराठी रंगभूमीची निर्मिती झाली असे डॉ. कारंतांचे मत आहे. हे मत बरोबर असू शकते. तंजावरी नाटके हा मराठी रंगभूमीचा उगम जर मानला तर मग कारंतांचे विधान निरपवादपणे मान्य

यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा / २८३