पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्तीवर गेलेले आहेत. मराठीतील वैभवशाली नाटक म्हणजे हे 'इंग्रजी धर्तीवर गेलेले नाटक' जे जास्तीत जास्त इंग्रजी धर्तीवरच जात राहिले. या मराठी, नाटकांचा उगम विष्णुदास भावे नाहीत. माझ्या म्हणण्याचा अर्थ विष्णुदास भावे यांना मराठी नाटकांचा उगम मानू नये असा नसून विष्णुदासांना जनकत्व बहाल करताना अभिप्रेत अर्थ नक्की व स्पष्ट असावा इतकाच आहे. डॉ. कारन्त
 डॉ. कृष्णमूर्ती आणि प्रा. भवाळकर या दोघांनीही यक्षगानाबद्दल जे विवेचन केलेले आहे त्याचा आधार डॉ. शिवराम कारंत यांचा प्रसिद्ध व सर्वमान्य ग्रंथ हा आहे. डॉ. कृष्णमूर्तीचा लेख तर बव्हंशी कारंतांचे विवेचन थोडक्यात सादर करणारा असाच आहे. यक्षगान या विषयावरील डॉ. शिवराम कारंत ह्यांचा दुहेरी अधिकार भारतभर सर्वमान्य आहे. एक तर यक्षगान या नृत्य-नाट्य- शैलीविषयीचे त्यांचे विवेचन सर्वमान्य मानले जाते. दुसरे म्हणजे या शैलीतून प्रत्यक्ष प्रयोग करणारे, प्रयोग बसविणारे व ही नृत्यनाट्यशैली शिकवणारे, लोकप्रिय करणारे नट व आचार्य म्हणूनसुद्धा कारंतांचा अधिकार सर्वमान्य आहे. या थोर कलावंत पंडिताचा अधिकार सर्वांच्याप्रमाणे मलाही मान्य आहे; पण अतिशय नम्रपणे हे सांगितले पाहिजे की, कारंतांचे विवेचन आत्मविसंगत आहे.
 कोणताही कलाप्रकार एकाएकी शिष्टमान्य होत नाही. तो शिष्टमान्य होण्यापूर्वी आणि शास्त्रपूत होण्याच्या पूर्वी लोककलाप्रकार म्हणून अस्तित्वातच असतो. जे लोककलाप्रकार अस्तित्वात असतात त्यांच्यातील काही शिष्टमान्य व शास्त्रपूत होतात. उरलेले कलाप्रकार लोकप्रिय असतात. ते क्रमाने लोकपरंपरेने पिढ्यान्पिढ्या चालत येतात. शिष्टांची व शास्त्रांची मान्यता नसणारे लोकनाट्य या गटात येते. जे लोककलाप्रकार शिष्टमान्य होतात ते शिष्टमान्य झाल्यानंतर पूर्वीसारखे राहात नाहीत. काही नवे संकेत निर्माण होतात. त्यांना शास्त्राच्या चौकटीत बांधले जाते आणि मग प्रतिष्ठित नागरकलाप्रकार अस्तित्वात येतो. यक्षगान हा असा नाट्यप्रकार आहे. तो लोककलाप्रकार म्हणून जनसामान्यात परंपरेने चालतच आला यामुळेच काही जातिजमातींचे लोक आजपावेतो पूजेसाठी हे नृत्य करतात.नवस म्हणून यक्षगान करण्याची शपथ घेतात.असे

२८२ / रंगविमर्श