पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरंभबिंदू
 आपण मराठी रंगभूमीचा विचार करू लागलो म्हणजे आरंभबिंदू म्हणून तीन जागा डोळ्यांसमोर ठेवतो. पहिली जागा, अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'शाकुंतल' नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची आहे. दुसरी त्यापूर्वीची जागा, विष्णुदास भावे ह्यांच्या 'सीतास्वयंवर' नाटकाच्या प्रयोगाची आहे. तिसरी त्याही पूर्वीची जागा तंजावरी नाटकाची आहे. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी या नाटकांच्याकडे प्रथम लक्ष वेधले. मराठीला पहिला मुद्रणसंस्कार महाराष्ट्राबाहेर झाला, मराठी नाटकाचा पहिला प्रयोगही महाराष्ट्राबाहेर झालेला दिसतो. ज्याला आम्ही मराठीचा आद्य शिलालेख मानतो ती जागा निदान आज तरी महाराष्ट्राबाहेर आहे. हा जर योगायोग असेल तर तो गमतीदार योगायोग म्हणावा लागेल आणि योगायोग नसेल तर त्याचे काही उत्तर द्यावे लागेल.
सीतास्वयंवराचा प्रयोग
 या तीन आरंभबिंदूंच्या जागा. यांपैकी इ.स. १८४३ साली सांगली येथे झालेला सीतास्वयंवराचा प्रयोग म्हणजे मराठी रंगभूमीचा उदय ही भूमिका अधिकतर सर्वमान्य व लोकप्रिय झालेली दिसते. प्रा. भवाळकरांनी आपल्या लेखाचा आरंभ करतानाच या बाबीचा प्रथा म्हणून उल्लेख केलेला आहे. ही प्रथा मान्य करायची की नाही, हा अगदी निराळा मुद्दा आहे. कारण ही प्रथा मान्य करणे अगर अमान्य करणे हे उत्तर दोन वेगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर अवलंबून आहे. जर आपण विष्णुदास भावे ह्यांचे नाटक प्रयोगदृष्ट्या यक्षगान शैलीतील नाटक आहे असे म्हणणार असू तर सुरचित संहिता असणारे आणि प्रयोग झालेले यक्षगान शैलीतील त्याहीपूर्वीचे नाटक तंजावरचे आहे आणि तंजावरी नाटकाचे तंजावरच्या राजदरबारात जसे प्रयोग झाले, तसे महाराष्ट्रात झाले नाहीत हे आपण म्हणू शकत नाही. या शैलीतील इतर नाटकांचे प्रयोग तर महाराष्ट्रात झालेले दिसतातच; पण तंजावरी नाटकांचेही महाराष्ट्रात काही प्रयोग झालेले असावेत हा संभव नाकारता येत नाही. दुसरे म्हणजे पुढे जी मराठी रंगभूमी विकसित झाली ती किर्लोस्करांपासून सुरू झालेली आहे व क्रमाने शेक्सपीअरचे नाट्यतंत्र आत्मसात करीत गेलेली आहे. स्वतः अण्णासाहेब किर्लोस्करांनाच असे वाटते की, आपल्या नाटकातील रस काही ठिकाणी इंग्रजी

यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा / २८१