पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १६ वे



यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा




 'यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा' या पुस्तिकेत दोन लेख एकत्र करण्यात आलेले आहेत. म्हैसूर विद्यापीठातील डॉ. एम. एस. कृष्णमूर्ती यांचा 'यक्षगान' या नृत्य-नाट्य-शैलीविषयीचा एक लेख आणि सांगलीच्या प्रा. तारा भवाळकर यांचा 'मराठी नाटक व यक्षगान' यांच्यातील अनुबंधाचा शोध घेणारा दुसरा लेख असे हे दोन लेख आहेत. मराठी रंगभूमी, मराठी नाटक या दोन्ही दृष्टींनी आणि रंगभूमीच्या प्रयोगप्रधान रूपाच्या उगमांचा शोध घेण्याच्या दृष्टीने हे लेख महत्त्वपूर्ण असल्यामुळे या विषयाच्या अभ्यासूंच्या माहितीत तर भर घालतीलच, पण संशोधनाला काही नव्या दिशा उपलब्ध करून देतील असा माझा विश्वास आहे.
 साहित्यप्रकार असोत किंवा कलाप्रकार असोत त्यांच्या उगमाचा जेव्हा आपण ऐतिहासिक दृष्टीने शोध घेतो त्या वेळी हा शोध प्रायः संदिग्ध व अंधक असा तर असतोच, पण उपलब्ध माहिती अनेक ठिकाणी परस्परविसंवादी असते. विवेचनाच्या आरंभीच्या काळात अंदाजाने दिलेली तोकडी व गोळाबेरीज माहिती आपल्या विवेचनाचा आधार कायम म्हणून पत्करण्यापेक्षा तपशिलांचा काळजीपूर्वक शोध घेणे व त्या आधारे अधिक सुस्पष्ट व रेखीव अशा निर्णयापर्यंत येणे अगत्याचे असते. या प्रक्रियेत सर्वच प्रश्न सुटत नसतात. उजेडात आलेली माहिती, काही जुने गुंते उलगडणारी ठरते तर काही नवे गुंते निर्माण करणारीही ठरते. हे दोन्ही लेख त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नवे प्रश्न निर्माण करणारे आहेत.

२८०/ रंगविमर्श .