पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्कृतविषयी गैरसमज
 संस्कृत भाषेसंबंधी आपण काही गैरसमज करून घेतलेला आहे. एक तर ती ब्राह्मणाची भाषा असे आपण समजतो. दुसरे म्हणजे ती धर्माची भाषा असे आपण मानतो. दोन्ही बाबी खऱ्या आहेत, पण त्यात सत्याचा अंश आहे. ब्राह्मणांची भाषा संस्कृत होती, पण क्षत्रियांची आणि साऱ्या त्रैवर्णिकांचीच भाषा संस्कृत होती. सर्वांचाच सामान्य जीवनव्यवहार प्राकृतातून चाले आणि शास्त्र-कला-धर्म-तत्त्वज्ञानाचा व्यवहार त्रैवर्णिकांपुरता मर्यादित होता, तो संस्कृतमधून होता. धर्मतत्त्वज्ञान संस्कृतमध्ये होतेच; पण राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, धातुविद्या, वैद्यक, घरे बांधणे, दारू बनवणे हे ज्ञान संस्कृतमध्येच लिहिले जाई. पुराणे व कथा - सरित् - सागर शृंगाराची नाटके व भगवद्गीता, कामशास्त्र व वनस्पतीशास्त्र सारेच लिखाण संस्कृतमध्ये आहे. गणिका वस्ती हे जिथे कायमस्थळ, विट हे जिथे कायम वक्ते आणि यश म्हणजे वेश्या मिळणे असे जिथे स्वरूप आहे ते भाणही संस्कृतमध्येच आहेत. संस्कृत नाटकाच्यामधील शृंगार फडक्यांच्या कादंबऱ्यांसारखा असतो. भाणातील उत्तानशृंगार प्रभाकर आणि होनाजीच्या लावणीसारखा आहे.
 ही प्रस्तावना विद्वानांच्यासाठी नाही. सर्वसामान्य जिज्ञासू रसिकांना पार्श्वभूमी कळावी यासाठी आहे. एक विचार असा येतो की, हे विवेचन व्यर्थ आहे. भाण वाचून ज्यांना कळणार नाही, त्यांना प्रस्तावना वाचून कळेल हे गृहितच चुकले आहे. भाणाचा अनुवादच मराठीत नको असे वाटेल त्यांनी दोष मला द्यावा. ही प्रस्तावना नको वाटेल त्यांनी दोष साधले यांना द्यावा, पण खाजगीत मिटक्या मारून भाण वाचणाऱ्यांनी जाहीर मात्र नाक मुरडावे हा दंभ बरा नाही.

चतुर्भाणी बावनखणी / २७९