पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनात थट्टेसाठी जे विचार येतील ते सारे श्रद्धावानाच्या डोक्यातही येऊन गेलेले असतात हे पाहणे मौजेचे आहे. ऐतिहासिक अडचण ही आहे की, धर्मावर अश्रद्धा निर्माण होण्यास लागणारे सर्व युक्तिवाद थट्टा म्हणून सुचतात, पण त्यामुळे श्रद्धा कधी हादरत नाहीत.
पादताडितकम्
 शेवटच्या 'पादताडितकम' या भाणाची सगळी मौज प्रेयसीने डोक्यावर पाय देणे या कल्पनेतील सूचनेवर आधारलेली आहे. रसिक ही घटना भाग्याची म्हणून तिची वाट पाहणार. श्रीमंत मूर्ख हा आपला अपमान मानणार. केवळ मूर्ख असल्यामुळे हे श्रीमंत गिहाईक गमवावे लागणार ही चिंता चतुर गणिकेला आहे. विलासी पण मूर्ख अशा गि-हाइकांच्या कहाण्या म्हणजे गणिका जगातील चविष्टपणे चघळण्याच्या बाबी असतात. आततायी, अत्याचारी हा गणिकेच्या भीतीचा विषय असतो. कोकणचा राजा इंद्रस्वामी हा अशा विकृत अत्याचाराचा नमुना आहे. मोफत मौज लुटणारे विट हा या जगात कौतुकाचा विषय आहे. श्रीमंत पण नबळे आणि श्रीमंत व तरुण पण मूर्ख कामुक हा गणिकांच्या प्राप्ती व विश्रांतीचा विषय आहे. या चौथ्या भाणात राधिकेचा उल्लेख आहे. निरपेक्ष या बुद्धभिक्षूशी बोलताना राधिकेचा संदर्भ आलेला आहे. राधेसह कृष्णाचा उल्लेख मुळात नाही. तो साधले यांचा कल्पनाविलास समजावयाचा. त्यांना राधा म्हटले की कृष्ण आठवतो. कृष्णाची राधा इ. स. च्या नवव्या शतकापूर्वी नाही. ही राधिका बौद्ध तंत्रातील आहे. बौद्ध तंत्रमार्गातील साधिका हीच राधिकाही असते. निरपेक्ष बौद्ध असला तरीही हरकत नाही. त्याने जुन्या गणिका मैत्रिणीला राधिका समजून साधना करावी असा विटांचा सल्ला आहे.
 भाणांचा हा सर्व जिवंत संस्कृतमधील अस्सल काव्याचा खजिना एकदम उघडा असा नाही. संस्कृत नाटकांनी कितीही उत्तान शृंगार सांगितला तरी काव्य आणि सूचकता हे दोन धागे तिथे दृढपणे सांभाळलेले असतात. शब्दाशब्दांच्यामध्ये अर्थाच्या सूचना असतात. मागचे संपादक अशा सर्व सूचना समजून घेण्यासाठी झटले. त्यांनी शब्दाशब्दांतील खोचकपणा उघडून दाखविला म्हणून आपण इतका तरी आस्वाद घेऊ शकतो.

२७८ / रंगविमर्श .