पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजावून सांगतो असे निमित्त करून हा भाण पुढे येतो. कवी ईश्वरदत्त फार सूक्ष्म जाणता आहे यात वाद नाही, पण अधिक शहाणे करीत वेश्यांकडेच नेणारा आहे. भाणाने परावृत्त करावे ही अपेक्षा नाही. संतवाङ्मयाचा परिणाम भाणांकडून अपेक्षू नये. भाणांनीही उगीच आपण माणूस सावध व नीतिमान करतो आहोत असा आव आणू नये.
 या भाणात साखळदंड तोडून रस्त्यावर येणाऱ्या माजलेल्या हत्तीचा व तो हत्ती आवरणाऱ्यांवर लुब्ध होणाऱ्या रमणीचा उल्लेख आहे. हा उल्लेख केवळ भासाच्या अविमारकाची आठवण करून देत नाही, मृच्छकटिकाचीही आठवण करून देतो.
 विट हा मूळचा सधन असतो. त्याने आपली सर्व संपत्ती उपभोगात समाप्त केलेली असते आणि तो उतारवयात कफल्लक झालेला असतो अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. यापैकी तो धनवान नसतो इतकेच वास्तव आहे. उतारवयात तो असू शकतो, पण मुळात धनवान असतोच असा संकेत आहे. विट आपला व्यवसाय सांभाळत असताना एखाद्या गणिकेशी अधिक परिचित होतात. या व्यक्तीशी जन्मभरासाठी जोडले जातात. गणिकेच्या तारुण्यात तिला गिहाईके गाठून देताना व आपण भोग व पैसा वसूल करताना आलेले संबंध बलवान होतात. मग ती व्यवसायातून क्रमाने निवृत्त झालेली गणिका मूलबाळ नाही म्हणून गणिकामाता होऊ शकत नाही. निवृत्त गणिकेने दूतीचे काम करावे. विटाने दुसऱ्या कुणाचे मध्यस्थ व्हावे आणि म्हातारा-म्हातारीने एकत्र राहून जगावे, असा उद्योग सुरू होतो. विटांची शाळा नसते. त्यांचे शास्त्र नसते. त्यांची संघटना नसते. शास्त्रचर्चा आणि वादविवाद व त्यात जय यात विटांना रंस असण्याचे कारण नसते, पण विट शास्त्रचर्चा करीत आहेत असा प्रसंग कल्पून कवी आपल्या माहितगारीची नोंद करतो. विटांची पंचायत एखादा वाद सोडविते असा प्रसंग कल्पून कवी एखादा चावट भाग लिहितो व उपहास करतो. नाटकाच्या सोयीपुरतीच खरी असणारी ही रचना असते. धूर्त विट संवादात गणिकाजीवनाविषयी बरीच चर्चा दोन विटांनी केलेली आहे. गणिका द्रव्यलोभी असतात हे मान्य करून गणिकाप्रीतीचे समर्थन व त्या निमित्ताने सर्व नीतीचा उपदेश करणाऱ्या धार्मिकांची चेष्टा या भाणात आहे. धर्मावर अश्रद्धा असणाऱ्यांनी धर्माची टिंगल करावी हे स्वाभाविक आहे, पण अशा अश्रद्धांच्या

चतुर्भाणी बावनखणी / २७७