पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवास करते आहे.
विरहदुःख
 विरहदुःख ही कल्पनाही गणिका जगात नीट समजून घेतली पाहिजे. चेहरा आजारी माणसासारखा ओढवलेला, शरीर पांढरे व कृश झालेले, असे सारे वर्णन करावयाचे असते. सत्य यापेक्षा निराळे समजायचे. गिहाईक मिळणार ही खात्री झाली की विरहामुळे आलेली क्षीणता घटकेत ओसरते आणि मीलनासाठी शृंगार करून निघताना तर सारे यौवन उसळत असते. तारुण्य खरे, उन्माद हाही अभिनय, विरह कृशताही अभिनय. मूळ गणिका प्रेमात पडते हाच अभिनय असतो. उभयाभिसारिका आणि पद्मप्राभृतक हे दोन भाग म्हणजे विटांचा खरा व्यवसाय सांगणारे भाण आहेत.
 उरलेल्या दोन भाणांचे स्वरूप या पहिल्या दोन भाणांच्यापेक्षा निराळे आहे. गणिकेला गिहाईक गाठून देणे, गिहाइकाला गणिका गाठून देणे, कलहात मध्यस्थी करणे हा विटाचा प्रमुख नित्य कार्यक्रम पहिल्या दोन भाणांत येतो आणि असा कोणताही धंदा चालू नसेल त्या वेळी असणारे रंजन व शास्त्रचर्चा उरलेल्या दोन भाणांत येते. यांपैकी एक म्हणजे या संग्रहातील तिसरा भाण मूळात धूर्त विटसंवाद या नावाचा आहे. विटांच्यामध्येसुद्धा शिष्टपणा दाखविण्याची एक अर्धदांभिक पातळी आहे. या पातळीवर हा तिसरा भाण आहे. भारतीय साहित्यातील मला न आवडणाऱ्या एका संकेताशी या भाणाचा संबंध आहे. भाण चांगलाच आहे त्यावर वाद नाही, पण संकेत मला नावडता आहे. दामोदराचे कुट्टीनीमतम् हे काव्यही असेच या संकेताशी जोडलेले आहे. दामोदर हा नवव्या शतकातील काश्मीरातील गणिकाजीवनाचा मोठा जाणता व तज्ज्ञ कवी आहे. गणिकाजीवनाचे मोठे तपशीलवार मार्मिक व रोचक चित्र तो कवितेतून समोर ठेवणार, पण श्रोत्यांना असे सांगणार की गणिका किती लोभी आणि धूर्त व द्रव्यहानी करणाऱ्या आणि फसविणाऱ्या लबाड असतात, हे सर्वांना समजावे, पटावे म्हणून हे काव्य मी लिहितो आहे. काव्य वाचून श्रोते सावध होतील व गणिकामैत्री वर्ण्य करतील. कुट्टीनीमतम वाचून कुणी गणिकामैत्री टाळणार नाही. सावध होऊन सावधपणेच पण, गणिकांच्याकडे श्रोता जास्त आकृष्ट होईल. गणिका आणि विट हे कसे लबाड असतात हे मी तुम्हाला

२७६ / रंगविमर्श