पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपला कंजूष व फुकट्या मित्र दोन हात जोडून नमस्कार करू लागला तर हा सांगणार, अरे एका हाताने नमस्कार पुरे, दोन हात म्हणजे उधळपट्टी झाली. वेश्यागामित्व हा राजरस्ता आहे. लग्न करून संसार मांडणे म्हणजे गल्लीबोळात शिरणे असे तो सांगणार. परशुरामाप्रमाणे हातात कुहाड घेऊन सारे बाप मारून टाकावेत आणि सर्व मुलांना वेश वस्ती बिनधोक करावी असाही त्याचा मनोदय आहे. नको नको, सोड सोड म्हणून दर्शनी कांगावा करणाऱ्या दूतीचा भोग घेणे म्हणजे मृदंगवादनाविना नाटक आरंभिणे आहे असे तो म्हणतो. असे परिहासाचे क्षण विटांनी जागोजाग शब्दबद्ध केलेले दिसतात.
 पृ. ३६ वर या भाणात एका गणिकेला डोक्यावरून पदर घेण्याचा अधिकार मिळो असा उल्लेख आहे. हा योग म्हणजे गणिकेच्या जीवनातील परमभाग्याचा योग मानला जाई. वसंतसेनेच्या वाट्याला शेवटी हा योग आलेला आहे. हा मुद्दा नीट समजून घेतला पाहिजे. गणिका या राजाच्या दागी आहेत. धंद्याला बांधलेल्या आहेत. त्यांच्यावर राजाचा कर आहे. कुणीतरी एकाने आपली म्हणून तिला ठेवून घ्यावे. ती एकाच्या आश्रयाखाली आहे तोवर तिला संरक्षण आहे; पण त्याने तिला सोडले की, ती सर्वांना पुन्हा मोकळी आहे. व्याधी आणि वेडेपणा सांगून ती नकार देऊ शकते. किंमत सांगून ती नकार देऊ शकते. पण तिचा दर देण्यास तयार असणाऱ्या गि-हाइकाला ती नावड, वार्धक्य, कुरूपता, मागचे भांडण, तिरस्कार सांगन नकार देऊ शकत नाही. या गणिकेला कणी प्रेमाच्या पोटी आपल्या पत्नीत्वाचा दर्जा देऊन ठेवून घेतो. तो राजाकडे किंमत भरतो व गणिकेला दास्यमुक्त स्त्रीचा, अवगुंठनाचा अधिकार मिळतो. तिचा वधू म्हणून उल्लेख केला जातो. डोक्यावरून पदर घेण्याचा अधिकार म्हणजे हा कुलीन स्त्रियांचा दर्जा. हा दर्जा सौंदर्य, कलागुण यामुळे मिळत नाही, तर द्रव्यलालसा नसणाऱ्या खऱ्या प्रेमाची खात्री जगाला व प्रियकराला पटवून तो मिळतो. हा अधिकार मिळणे म्हणजे सेवादास्यातून मुक्तता. गणिकेला हा प्रतिष्ठेच्या दृष्टीने सर्वांत मोठा सन्मान आहे. अशी व्यवसाय विसरून खरे प्रेम करणारी दुर्मिळ; पण ती आढळेल तेव्हा व्यवसायाचे स्वार्थ विसरून तिचे गुणगान करण्याइतका विटही हळवा पूजक झालेला असतो. गुणलुब्ध गणिकांच्या निरपेक्ष प्रीतीच्या काही कहाण्या संस्कृत साहित्यात आहेत. वसंतसेनेची कहाणी ही त्यांपैकी एक भाणात आलेली कुमुद्वती त्या दिशेने

चतुर्भाणी बावनखणी / २७५