पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दांभिकांना रात्री गणिका हवी. दिवसा पर्वकाळ म्हणून तिच्याच घरी होमहवन हवे. मात्र हवन चालेतो सोवळे पाळलेच पाहिजे. ते संपले की भोग आहेच. दंभाच्या विविध रूपांची कठोर विटंबना करण्यात विटाला फार आनंद होतो. स्वतःच्या पौरुषाचा डंका वाजवीत फिरणारे वयस्क, स्वतःच्या धार्मिकतेचा तोरा मिरविणारे वेश्यागामी, गणिकांच्या गराड्यात रमणारे न्यायाधीश आणि राजाचे मंत्री या साऱ्यांच्यापेक्षा विट स्वतःला वरचढ मानतो. कारण तो गुंड आहे, धूर्त आहे, पण दांभिक नाही. लोकांनी आपल्याला सज्जन व पुण्यवान समजावे अशी त्याची इच्छाही नाही.
 भांडणे निर्माण करणे यात त्याला संकोच नाही. मूलदेव हे बडे गिहाईक त्याने गाठलेले आहे. देवदत्ता आणि सहदेवसेनाही तो गिहाइकांच्या पदरात बांधणार. दोघींचाही मध्यस्थ तोच. तितकेच उत्पन्न वाढले, पण या मूलदेवाला गाठण्यासाठी इतरही स्पर्धक आहेत हे तो जाणतो. खोटे बोलून मूलदेवाकडे वळणाऱ्या एका गणिकेकडे वळणाऱ्या गणिकेचे तिच्या विटाशी भांडण लावून आपण मौज पाहत बसणे यात रंजनही आहे, आपल्या व्यवसायाचा सुरक्षितपणाही आहे हे विट जाणतो.
 विटांना वर्ण्य काहीही नाही. गणिका चालेल, दूती व दासी चालेल. भिक्षुणी चालेल. मात्र बलात्कार त्यांना मान्य नाही. विटांना अध्यात्मातील कल्पना चावट अर्थ सांगण्यासाठी चालतात. तो वैशेषिक, बौद्ध दर्शनातील कल्पना वापरतो. भगवद्गीतेतील कल्पनाही वापरतो. गीतेत उपभोगातून कासवाप्रमाणे आपली इंद्रिये बाहेर ओढून घेणाऱ्या स्थितप्रज्ञाचे वर्णन आहे. विट ही कासवाची उपमा वेश्यावस्तीत रमलेल्या, पण घाबरल्यामुळे उदासीन भासणाऱ्या एखाद्या गिहाईकाचे वर्णन करताना वापरणार, पण बलात्कार त्याला मान्य नाही. बलात्कार त्याच्या धंद्याला न परवडणारा आचार आहे. कामुकांना खर्च नाही, गणिकेला कमाई नाही म्हणजे विटाचा धंदा बुडाला. लंफगेपणा क्षम्य आहे पण अत्याचार मात्र निंदनीयच मानला पाहिजे हे त्याचे नीतिशास्त्र आहे. विट नेहमी उपहासच करतो असे नाही. तो परिहासाचाही पंडित आहे.
 आशीर्वाद म्हणून तो गणिकेला सांगणार की, तुझ्या दारातील गिहाइकांची गर्दी कमी होणार नाही. कुणाही एकाच्याकडे नांदण्यातील सुरक्षितता तुला मिळणार नाही असा ध्वनी इथे कुणाला जाणवला तर विटाचा नाइलाज आहे.

२७४/ रंगविमर्श