पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपले स्थान जाणणे व त्याचा जगण्यासाठी वापर करणे हे जमावे लागते. हे कार्य नीट साधावे यासाठी आवश्यक असणारा लोचटपणा, निर्लज्जपणा व धूर्तपणा हे विटाचे भांडवल असते. कलह झालेल्या जोडीत मध्यस्थी करताना, एकाच गिहाइकाला दोन्ही बहिणी गाठून देताना विट सारे श्रेय ऋतूला, कामदेवाला, तारुण्याला देतो. तो स्वतःविषयी भ्रमात नसतो.
पद्मप्राभृतक
 साधले यांच्या अनुवादातील प्रथम भाण मुळात 'उभयाभिसारिका' या नावाचा आहे. दुसऱ्या भाणाचे नाव 'पद्म प्राभृतक' असे आहे. यातील एक कल्पना मला थोडी लक्षणीय वाटली. व्यवसायात रुळलेली भर तारुण्यातील देवदत्ता ही तूप-मधात घोळलेल्या मिष्टान्नासारखी व नवतरुण दारिका धंद्याच्या उंबऱ्यावर असणारी देवसेना ही कोवळ्या आंबट कैरीच्या लोणच्यासारखी आहे. सर्व रतिरहस्य जाणणारी अनभवी तरुणी आणि नवतरुणी असा हा भेद आहे. हे ठिकाण वाचताना माझ्यासारख्याला जर शाकुंतलाची आठवण झाली तर ती क्षम्य मानली पाहिजे. विदूषकाच्या तोंडून कालिदास दुष्यंताला हे ऐकदितो की, पूर्वपत्नी या पेंडखजुरीसारख्या आहेत व शकुंतला चिंचेसारखी आहे. हे भाण मी अभ्यासिले नव्हते तेव्हा सर्वांप्रमाणे मलाही असे वाटते आले की, राजवाड्यातील राजकन्या म्हणजे पेंडखजूर आणि जंगलातील ऋषिकन्या म्हणजे चिंच. या भाणाचा परिचय झाल्यावर मला हे जाणवू लागले की, अनुभवी पत्नी हिच्यापेक्षा नवतारुण्यवती अननुभवी शकुंतला ही वेगळी कशी आहे हे सांगणेही कालिदासाला अभिप्रेत असू शकेल. कालिदासाचा विदूषक दुसऱ्या अंकात ज्या पद्धतीने बोलतो आहे ती भाषा विदूषकाच्या हास्यापेक्षा विटांच्या उपहासाची आठवण अधिक करून देते.
 विट पाथरवट दगड घडवितो त्याप्रमाणे कविता घडविणाऱ्या कवीची थट्टाही करतो. जुन्या जोड्यातील फाटकेतुटके घेऊन नवा जोडा शिवणारा चांभार आणि हे कवी सारखेच आहेत. फार तर हे तुकडे जुन्या जोड्याचे तुकडे नाहीत असे कवी म्हणेल, पण ही कविता फुलासारखी नव्हे, पादत्राणासारखी इतके तर ठरेल. या कवींच्या सारखेच वेशात जमून व्याकरणावर चर्चा करणारे पंडित आहेत. वेशवस्तीत राहूनही वेळेवर होमहवन करणारे धार्मिक आहेत. या

रं....१८
चतुर्भाणी बावनखणी / २७३