पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसणाऱ्या लबाडांच्यावर आहे. गौतमाच्या न्यायदर्शनापेक्षा निराळा असा वैशेषिकांचा गट अस्तित्वात आहे. असा काळ भाणांच्याबाबत विचारात घ्यावा लागतो. अजून बौद्धधर्म सर्वांच्या आदराचा विषय आहे. तांत्रिकांचे प्राबल्य अजून समाजात सार्वत्रिक नाही. ही अवस्था भवभूतीपूर्वीची आहे. या धार्मिकांच्या बाजूला सुकुमारिका ही नपुंसिकासुद्धा समजून घेतली पाहिजे. राजाचा मेहुणा रामसेन याने ही सुकुमारिका ठेवलेली आहे. या रामसेनाला पत्नी असणारच. नृत्यप्रयोगात नव्या गणिकांशी तो मैत्री करतो. अनेक गणिकांशी संबंध ठेवणारा हा एक उडाणटप्पू आहे, पण त्याला कायमचे एक पात्र हवे. रति-लतिका, पियंगुसेना असे अनेक संबंध हा राजशालक ठेवतो. तेव्हा या नपुंसकेला आपल्या अस्तित्वासाठी कलहशील व मत्सरी असणे भागच आहे.
 विट सुकुमारिकेला सांगतो, स्तनाचा अडथळा नसल्यामुळे तिचे आलिंगन अधिक गाढ आहे. ऋतूची अडचण नसल्यामुळे भोग नित्य आहे आणि गर्भसंभव नसल्यामुळे म्हातारपण नाही. कोणत्याही गणिकेपेक्षा नपुंसिका याप्रमाणे श्रेष्ठ ठरेल. हे विटाचे प्रामाणिक मत मानण्याची गरज नाही. त्याला या गटाचा तिटकारा आहे, पण हे सोयिस्कर असत्य बोलणे विट पत्करतो. यापुढे विट धनमित्राला भेटतो. माजलेला आणि लबाड असणारा हा व्यापारी गणिकांनी प्रेमात फसवून देशोधडीला लावला आहे. या धनमित्राविषयी विटाला तिरस्कार आहे, पण त्याच्याशीही समोरासमोर लबाडीने मधुर भाषण तो करतो. सर्वांशी गोड बोलायचे. आपल्या व्यवसायातील स्वतःची फायदेशीर कामे तेवढी करायची. उरलेली खोटी आश्वासने. विट या पद्धतीने जगतो. त्याच्याशी मधर भाषण करणाऱ्या गणिकासुद्धा त्याच्यावर फार विश्वास ठेवून बोलत असतील असे मानण्याचे कारण नाही. खोटेपणा हे या जगाचे सर्वव्यापी चित्र आहे.
 प्रेमाच्या नाटकामुळे फसलेले मूर्ख मातेला दोष देतात आणि 'प्रेयसी' साठी मात्र झुरतात. विटाचे म्हणणे असे आहे की, सर्व क्रूर कामे स्वतः करून जबाबदारी ढकलणाऱ्या राजांच्याप्रमाणे या गणिका आहेत. गणिकांच्या द्रव्यलोभीपणाबाबत, त्यांच्या खोटेपणाबाबत विट नेहमी बोलतात, पण हे त्यांचे स्वगत बोलणे आहे. या लबाड जगात लबाडी करीतच आपण जगतो याचे भान विटांना आहे. वासनेची ऊर्मी असणारे सधन विलासी कामुक आणि तारुण्य व धंद्याची गरज असणाऱ्या गणिका यांच्यात आपण केवळ निमित्त आहोत, हे

२७२ / रंगविमर्श