पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आताच गमवायला तयार नाही. त्यालाही आताच भांडण नको आहे. बरे, उद्या आवश्यकच असेल तर नारायणदत्ता सोडणे कठीण नाही. तिलाही नवा प्रियकर गाठणे कठीण नाही. जोडी फुटली तर आकाश कोसळणार नाही. जोडी टिकविणे धंदा म्हणून गरजेचे आहे. अशा कथानकात विटाला करण्याजोगे कामच काय? विट तरी नारायणदत्तेकडे जाऊन अभिसाराचाच सल्ला देणार. नारायणदत्तेने तो मार्ग आधीच पत्करला व भांडण मिटवून टाकले. अशा साध्या कथानकाच्या निमित्ताने नाटककार अनेकांची थट्टा, अनेकांचा दंभस्फोट करतो आहे. मूळ भाणात उपहासच प्रमुख असतो, मर्मभेद प्रमुख असतो. कथानक हे फार महत्त्वाचे नसते. कथानकाचे महत्त्व बेताचे असते.
 या भाणातच वेशात असणाऱ्या विष्णुनारायणाच्या मंदिराचा उल्लेख आहे. या वस्तीत काही देवळे असणार. गणिकांच्या धार्मिकतेमुळेही आणि नृत्य, गीत, नाट्य यांच्या कार्यक्रमासाठीही. आपल्या परंपरेत साऱ्या विलासयंत्रणेला धर्माची झालर लावलेली असते, त्यातील हा प्रकार आहे. नव्याने तारुण्यात आलेल्या मुली यांना 'दारिका' म्हणतात. व्यवसायाला वाहिलेल्या गणिका, माता इ. च्या व्यवहार व धर्माच्या सोयींच्यामुळे हे देऊळ गजबजलेले असे. देवीमंदिर, शिवाची मंदिरे यांचा वेशवस्तीतील उल्लेख या भाणांच्यामधून तुरळकपणेसुद्धा आढळत नाही. महाकालाचा जो एक उल्लेख आहे ती वस्ती वेशाबाहेरची आहे. विटाची भेट अनंगदत्तेशी होते. हा तिला रुचेल असे बोलतो. नंतर विष्णुदत्तेची भेट होते. विट तिलाही दिलासा देतो. खरे म्हणजे तो आपल्या चरितार्थाला बांधलेला आहे. फुकटची समाजसेवा करण्यात त्याला रस नाही, पण उद्या काम कुणाशी पडणार याचा नेम नाही म्हणून सर्वांशी गोड बोलणे हे कर्तव्य विट निभावीत असतो. विटाच्यासाठी सर्व वेश्या आणि कामुक ही गिहाईके आहेत व तो कुणाला असंतुष्ट करू इच्छित नाही.
 या वस्तीतून वावरणाऱ्या मंडळींत व्यभिचाराला चटावलेली वैशेषिक तत्त्वज्ञानाची अनुयायी विलासकौंडिनी आहे, बौद्ध भिक्ष व भिक्षुणी आहेत. स्वतःला अतिशय धार्मिक मानणारा एक भागवत आहे. या साऱ्यांची भेट इथे होते. याचे कारण वैशेषिक बुद्ध दर्शन अगर भागवत संप्रदाय हे नाही. कोणत्याही धर्मांत, धर्मगटांत काही लबाड व लुच्चे शिरलेले असतातच. त्याचे हे चित्र आहे. ही टीका त्या त्या धर्मगटावरील नाही, तर कुठेही ठाण मांडून

चतुर्भाणी बावनखणी / २७१