पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संततीला परवा परवापर्यंत पित्याचे नाव लावण्याची परवानगी नव्हती. साधले यांनी कालिदासपूर्व ‘सौमिल्लक' आणि भाणातील 'श्यामिलक' हे एकच असावेत असाही कयास केलेला आहे. सौमिल्लक हा कालिदासापूर्वीचा मान्यवर नाटककार. भाणांच्या लेखकांना कालिदास गौरविणार नाही हेही उघड आहे आणि हे प्राचीन भाण कालिदासाला थोडे उत्तरकालीन आहेत हेही उघड आहे. साधले यांना हे सारे माहीत आहे, पण खोडकरपणाचा एक भाग म्हणून साधले यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत. हा खोडकरपणा आहे इतकेच मला सांगणे भाग आहे.
 संस्कृत नाटकांच्यामधील उपहास आणि उपरोध यांचे सर्वांत समृद्ध दर्शन हा या भाणांचा विशेष आहे. संस्कृत परंपरेप्रमाणे हास्य हा शृंगारातून जन्मणारा, त्याच्यासह असणारा रस आहे. नाटकांच्यामध्ये असणारा हास्यरस प्रामुख्याने विदूषकासह असणारा आहे. भोळेपणा, भित्रेपणा, खादाडपणा, बुद्धीने मंद असणे, मूर्ख असणे इ. प्रकार या विनोदात नेहमीचे आहेत. भाणांच्यामध्ये चतुर आणि लबाड असणारा विट विनोदाचा आधार आहे. विटाचा विनोद उपहास आणि उपरोध यांनी भरलेला आहे. सफाईने खोटे बोलणे, दंभ उघडा करणे हे विटाचे कामच आहे. भाणांच्यामध्ये असणारे काव्यही उत्तान, शृंगाराचे बोलणे अनेकदा चावटपणाचे, उपरोध मर्मावर जाऊन पोचणारा असा आहे. ही एक शक्यता आहे की नकळत या उपहासातून काही समकालीनांच्यावरही टीका असेल.
कल्पित जग
 भाणांचे जग हे वास्तव जग नव्हे. वास्तवाशी फारकत असणारे हे कल्पित आहे. आधुनिक वाचकाला वास्तव नसूनही मृच्छकटिक वास्तव वाटते. वास्तवात गणिकांच्या नादी लागणारे राजे आहेत. राजकारणात गोंधळ घालणाऱ्या गणिका आहेत. त्याचे थोडेसे चित्र राजतरंगिणीत सापडेल, पण हे नाटकात दाखवायचे नसते. नाटकाचे काही नियम आहेत. हे नियम पाळूनच भाणाची रचना झालेली आहे. म्हणून या चित्रणाला वास्तववाद समजायचे नाही, पण समाजाच्या एका भागाचे वास्तवाशी खूप जवळ असणारे हे चित्रण आहे हे समजूनच या वाङ्मयाकडे पाहिले पाहिजे.

चतुर्भाणी बावनखणी / २६९