पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रियकर मानणे, त्याच्याशी प्रीतिकलह करणे हे तर आवश्यकच असते, पण तुटेपर्यंत ताणावयाचे नाही, म्हणून गणिकांना सदैव अभिसाराचे, आपण होऊन नटूनथटून प्रियकराकडे जाण्याचे सल्ले आहेत. धंदा रुसण्याची संधीच देणारा नाही. मध्यस्थी करणारे विट व मूळ गणिकाच, भांडण फारसे वाढू नये यासाठी दक्ष असतात. आपल्या मनात असणाऱ्या निष्ठा या जगात परवडणाऱ्या नाहीत. कुलीन स्त्री-पुरुषांच्या बाबतीत असणाऱ्या अपेक्षा गणिका वस्तीत घेऊन जाणेच बरोबर नाही.
वात्स्यायन व दत्तक

या ठिकाणी आनंद साधले यांच्या प्रास्ताविकातील एक-दोन मुद्द्यांचा थोडा विचार केला पाहिजे. भाणांच्यामध्ये वात्स्यायन कामसूत्राचा उल्लेख नाही, पण दत्तकाच्या कामशास्त्राचा मात्र उल्लेख आहे आणि दत्तक हा या शास्त्रातील वात्स्यायनापूर्वीचा शास्त्रज्ञ. तेव्हा सौम्यपणे सूचना ही की भाण वात्स्यायनापूर्वीचे असावेत. सौम्यपणे सांगायचे तर ही सूचना मान्य करता येत नाही. वात्स्यायन कामसूत्र कुलीन सांसारिकांनी अभ्यासावे यासाठी आहे. परंपरेत वात्स्यायनाचा दर्जा ऋषीचा आहे. दत्तकाचे कामशास्त्र गणिकांच्या गरजेसाठी म्हणून होते. यामुळे वाङ्मयीन संकेत असा की, भाणांच्यामध्ये असणाऱ्या या गणिकांच्या जगात सर्वत्र दत्तकाचा उल्लेख करावयाचा. ऋषितुल्य पूज्य वात्स्यायन हे गणिकांच्या अभ्यासात उल्लेखावयाचे नाही. या संकेतामुळे भाणात वात्स्यायनाचा उल्लेख नसतो. एरव्ही वात्स्यायन हा भाणांच्यापेक्षा जुना आहे, हे पुराव्याने सिद्ध करता येते. वात्स्यायन गुप्तकाळापूर्वीचा आहे.

मालविकाग्निमित्रम्
 साधले सांगतात, मालविकाग्निमित्रातील विदूषक हा विटाचेच काम करतो. हे खरे आहे. विट आणि विदूषक यांच्यातील पडदा फार विरविरीत आहे. पण राजासाठी कुलीन राजकन्या गाठण्याचे काम करतो म्हणून एकाला विदूषक म्हणायचे. गणिका गाठण्याचे काम करणारा विट असतो. विट जगतो वेश्येकडून होणाऱ्या कमाईवर गिहाइकांकडून होणारी कमाई त्यामानाने गौण. विट कुणाही एकाचा आश्रित नव्हे. विदूषक हा एका कुलीनाचा आश्रित असतो. साधले सांगतात, गोमंतकातील गणिकांची संतती पित्याचे नाव लावते हे खरे नाही. या

२६८/ रंगविमर्श