पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तज्ज्ञांनी दिलेला आहे. खरी माता नसेल तर खोटी माता निर्माण करावी अशी सूचना आहे.
 प्राचीन भारतातील या गणिका जगाचे चित्र काही वास्तविक व काही कल्पित असे अनेक ग्रंथांच्यामधून विखुरलेले आहे. गुणाढ्याची आज लुप्त असणारी बृहत्कथा हे या जीवनाच्या चित्रणाचे मोठे भांडार होते. बृहत्कथेतील चित्रण बुधस्वामीच्या बृहत्कथा श्लोकसंग्रहात कथा - सरित्सागरात आणि बृहत्कथा मंजिरीत पाझरलेले आहे. वसुदेव हिंडीसुद्धा याच प्रमुख कथांची जैन आवृत्ती म्हणून पाहता येतो. दंडीचे दशकुमारचरित, दामोदराचे कुट्टनीमतम् हे काव्य, क्षेमेंद्राचे तमयमातृका हे काव्य या जीवनाचेच चित्रण करते. वात्स्यायन कामसूत्र, कौटिलीय अर्थशास्त्र आणि राजतरंगिणी यातही खूप माहिती आहे. प्रकरण, भाण, पुराणे व इतर काव्ये यांतील माहिती मी कामसूत्र व अर्थशास्त्राच्या प्रकाशात समजून घेतली आहे. तिचाच स्थूल आराखडा म्हणजे वरील विवेचन होय.
प्रेम
 भाणाच्यामधील प्रेम हा शब्द या संदर्भात पाहिला पाहिजे. गणिकांना तरुण, देखणा, श्रीमंत व उदार असा नायक, गिऱ्हाईक म्हणून हवा असतो. उदार आणि श्रीमंत असेल तर तरुण आणि देखणा हे दोन मुद्दे गौण असतात. अशा उचित गिऱ्हाइकांची माहिती करून घेणे व त्यांच्या प्रेमात पडणे हे गणिकेचे काम. हे गिऱ्हाईक गाठण्यासाठी गरजेनुसार दूतीचा, विटाचा वापर होतो. माता व्यवहार सांभाळते. या वातावरणात प्रेम या शब्दाला जो अर्थ असू शकतो तेवढाच येथे खरा असतो. सर्वांचे व्यवसाय वंशपरंपरेने चालत आलेले, जन्मभर चालणारे, त्यामुळे एका मर्यादेत सगळी चर्चा उघड असते. आपली मुलगी अमुक प्रतिष्ठिताकडे अगर सधनाकडे सुखभोग घेते आहे हे सांगताना मातेला संकोच नाही. मी अमक्याकडे रात्र घालवून येते हे सांगताना गणिकेला संकोच नाही. पुरेसा उत्तानपणा या वस्तीतील संभाषणात असणारच. आपली बहीण ज्याच्याकडे आहे तोच माणूस गाठणे यातही संकोच नाही. कारण गिऱ्हाईक दहा ठिकाणी जाणार आणि ते सधन आहे. मग दोन्ही मुलींनी त्याला दोन बाजूंनी गाठणे हा व्यवहार आहे. पद्मप्राभृतक भाणात हा व्यवहार दिसेल. गिऱ्हाईकाला

चतुर्भाणी बावनखणी / २६७