पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसतो त्यामुळे तो एक नाटकीय संकेत आहे अशी काही जणांनी समजूत करून घेतली आहे. मृच्छकटिकातील चारुदत्त राजा नाही, पण त्याच्याजवळ विदूषक आहे. नाट्यशास्त्रात राजे सरदार-व्यापारी यांच्यासह ऋषी व तपस्वी यांच्याहीसह विदूषक असतो याची नोंद केली आहे. नाटकाच्या बाहेर अनेक ठिकाणी विदूषकाचे उल्लेख आहेत. मनोरंजन करणारे, हास्य निर्माण करणारे खुशमस्करे हा राजदरबाराचा व सरदाराच्या परिवाराचा भाग असे. कुठे कुहक म्हणून तर कुठे नर्मसचिव म्हणून विदूषक आपणासमोर येतो. राजे-सरदार-व्यापारी या प्रतिष्ठित वर्तुळात वावरणारा आणि आपल्या नेत्याचे शृंगारविलास सांभाळणारा विदूषक असतो. वात्स्यायनाने एक व्यवसाय म्हणूनच विदूषकाकडे पाहिले आहे. तो वास्तव जीवनाचा भाग आहे. प्रतिष्ठितांची प्रेमप्रकरणे हाताळणे व प्रसंगी त्यांना कुलीन कन्या पत्नी म्हणून गाठून देणे, क्वचित गणिकांच्याकडे दौत्य करणे हे विदषकाचे काम आणि हेच काम करताना वेश्यावस्तीत वावरणे हे विटाचे काम आहे. याच गटात पिठ मर्द येतात.
 गणिका व्यवसायात गणिकामाता हिलाही महत्त्वाचे स्थान आहे. गणिका शरीर देते. त्याचा मोबदला घेते. हा नागडा व्यवहार सुसंस्कृत पद्धतीने व्हावा यासाठीच गणिकामाता असते. प्रत्यक्ष गणिका ही फक्त प्रेमात पडते. तिला व्यवहाराच्या गोष्टी नको असतात. गणिकेने फक्त प्रेम बोलावे असा आदेश आहे. गणिकामाता सतत पैसा मागते, द्रव्यलोभी असते. या द्रव्यलोभी आईच्या आज्ञेत गणिका वावरत असते. वास्तविक चित्र असे आहे की गिहाईक गाठण्याची यंत्रणा म्हणून विट आहे. मोबदला वसूल करण्याची यंत्रणा माता असते. दरिद्री गिहाईके हाकून देणे, सधन गिहाइकांकडून पैसा वसूल करणे ही कामे जर चोखपणे माता करीत असेल तरच प्रेमात पडणे गणिकेला परवडत असते. परिस्थितीवर खरा ताबा गणिकेचा असतो. म्हणूनच गणिका कितीही अभिनय करो ती आईच्या आज्ञेबाहेर जात नाही. आईने निवारण केलेल्या प्रियकराला चोरून भेटणे, आईने आणलेल्या सधनाला नाइलाजाने शय्यासुख देणे या साऱ्या बाबी प्रायः अभिनयाचा व योजनेचा भाग असतात. गणिका हीसुद्धा माणूस आहे. खरे प्रेम आणि खरा तिटकारा तिच्याजवळ नसतो असे मानण्याचे कारण नाही. पण हा प्रकार असतो तेव्हा व्यवसायाची हानी होते. व्यवसायहिताच्या दृष्टीने गणिकेला एक माता असणेच आवश्यक आहे. असा आदेशच या क्षेत्रातील

२६६ / रंगविमर्श