पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या भीतीपासून दूर राहता येई हे तर होतेच, पण एकचारिणीला विश्रांतीही खूप असे. आजाराची भीती कमी असे. वात्सायनाने एकचारिणी होणे हेच ध्येय गणिकांनी आपल्यासमोर ठेवावे असा सल्ला दिला आहे तो नैतिकदृष्टी समोर ठेवून नव्हे, तर दीर्घजीवी सुख ही कल्पना डोळ्यांसमोर ठेवून.
 'वेश' हे गणिकाचे जग आहे. या जगात वेश्यांना आपली जाहिरात करणारे व संपन्न गिहाइके गाठून देणारे दलाल हवे असतात. साधले यांनी रासवटपणे सर्वत्र ‘भडवा' असा शब्दप्रयोग केलेला आहे. मळ संस्कत शब्द विट असा आहे. या विटाचे उल्लेख नाट्यशास्त्रात आणि वात्सायन कामसूत्रात तर आहेतच, पण नाटक काव्यात आणि राजतरंगिणीसारख्या इतिहासग्रंथातही आहेत. विट चतुर, बोलका आणि ऊहापोहक्षम असतो. नटणारा आणि शृंगारात रमणारा असतो. ज्ञानी व शहाणा असतो, पण भोगविलासात संपत्ती उडविलेला असतो. अशा प्रकारची जी विटाची वर्णने आहेत, त्यावरून विट म्हणजे नक्की कोण याचा पत्ता लागत नाही. विट हा संधिविग्रहिक असतो हे त्याचे खरे लक्षण. तो गिहाईके गाठणारा असतो. विटांचा चरितार्थ या उद्योगावर चाले. संपन्न गिहाईकांकडून व अशी गिहाईके आणू दिल्याबद्दल वेश्यांच्या कडून जी बिदागी मिळे त्यावर विटांचा चरितार्थ चाले. काही विट वेश्यांनी आपल्या नोकरीत ठेवलेले असत. या विटांना पैसे तर द्यावे लागतच, पण मोफत भोगही द्यावा लागे. विट हा दलाल होता, तसा गुंडही होता. गि-हाईकांसाठी वेश्या पळवणे, दुसऱ्या विटाशी मारामाऱ्या करणे, वेश्येच्या विळख्यातून आपले गि-हाईक सोडवून आणणे ही कामेही करावयाची तयारी असणे ह्या धंद्याला जरुरीचे असे. अत्तरे, कलप, चांगले कपडे, फुले, दारू यांच्या उपभोगाची आवड असणारा व दलालीवर जगणारा असा हा विट नाटकांचा एक भाग नाही. तो नाट्यसंकेत नव्हे. विट हा त्या वेशवस्तीशी संलग्न वास्तव समाजाचा भाग आहे. विट हा नेहमी उतारवयाचाच दाखविणे हा मात्र नाट्यसंकेत आहे. वास्तवातील विट कोणत्याही वयाचा असे आणि मोठ्या प्रमाणात हे विट गणिक संघातील पुरुष म्हणून जन्मलेले लोक असत. नाटकात मात्र ते गणिकांशी नात्यांनी जोडलेले दिसत नाहीत.

चतुर्भाणी बावनखणी / २६३